ऋषिकेश बामणे, लोकसत्ता
मुंबई : ग्रँडस्लॅम स्पर्धामधील भारतीय खेळाडूंची कामगिरी सुधारण्यासाठी वैयक्तिक प्रशिक्षकांची नितांत गरज आहे, असे मत भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णाने व्यक्त केले. टाटा महाराष्ट्र टेनिस स्पर्धेमुळे राज्यातील क्रीडा क्षेत्राला पुन्हा एकदा चालना मिळेल, असे ४१ वर्षीय बोपण्णाने सांगितले.
पुण्यामध्ये सध्या टाटा महाराष्ट्र स्पर्धा सुरू असून यामध्ये भारताचे नामांकित खेळाडू सहभागी झाले आहेत. जानेवारी महिन्यात रामकुमार रामनाथनच्या साथीने बोपण्णाने अॅडलेट स्पर्धा जिंकली. त्यामुळे आताही त्याला पुरुष दुहेरीत जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
‘‘गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रासह अन्य राज्यातील क्रीडा क्षेत्रही ठप्प आहे. परंतु टाटा महाराष्ट्र स्पर्धेमुळे येथील क्रीडा क्षेत्राची गाडी पुन्हा रुळावर येऊ शकते,’’ असे बोपण्णा म्हणाला. तसेच भारतीय खेळाडूच्या साथीने कोणत्याही स्पर्धेत सहभागी व्हायला मला अधिक आवडते, असेही बोपण्णाने नमूद केले.
भारताच्या एकेरीतील खेळाडूंच्या ग्रँडस्लॅम स्पर्धामधील कामगिरीविषयी विचारले असता बोपण्णा म्हणाला, ‘‘खेळाडू त्यांच्या परीने सर्वोत्तम प्रयत्न करत आहेत. परंतु कोणत्याही खेळाडूला ग्रँडस्लॅम स्पर्धामध्ये पुढपर्यंत वाटचाल करण्यासाठी वैयक्तिक प्रशिक्षक तसेच फिजिओची नितांत गरज असते. यासाठी अधिक खर्च करावा लागत असला तरी खेळाडू आणि खेळाच्या प्रगतीच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण आहे. कॅनडाचा डेनिस शापोवालोव्ह, फेलिक्स अलिसिमे या खेळाडूंनी अल्पावधितच प्रकाशझोत मिळवला आहे, कारण त्यांना त्या दर्जाचे मार्गदर्शन लाभते.’’
गेल्या वर्षभरापासून तब्बल २८ आठवडे जैव-सुरक्षा वातावरणात टेनिस खेळल्यामुळे या स्पर्धेनंतर आपण काही काळासाठी विश्रांती घेऊन फ्रेंच स्पर्धेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करणार आहोत, असेही बोपण्णाने सांगितले.
युवा खेळाडूंसाठी खास सराव सत्र
बेंगळूरु येथील अकादमीतून भारताला ग्रँडस्लॅम विजेते खेळाडू लाभावे, यासाठी किशोरवयीन खेळाडूंना बोपण्णा अव्वल दर्जाचे प्रशिक्षण देत आहे. ‘‘केशरी चेंडू वेगाने तुमच्याकडे येतात. तर लाल चेंडूने तुम्हाला धीम्या गतीचे फटके खेळणे सोपे होते. भारतातील प्रत्येक अकादमीत प्रामुख्याने किशोरवयीन खेळाडूंना या चेंडूने सराव करण्यावर भर दिला. तर वरिष्ठ वयोगटापर्यंत त्यांचे तंत्र अधिक विकसित होईल. तसेच हिरव्या टेनिस चेंडूचा त्यांना लवकर अंदाज येईल,’’ असे बोपण्णा म्हणाला.