साक्षी मालिकने रिओ ऑलिम्पिकमध्ये पदकाला गवसणी घातली खरी, पण महाराष्ट्रातील पुरुषी मानसिकता अजूनही बदललेली नाही. महाराष्ट्रातील मुलींना अजूनही पुरुषांच्या आखाडय़ात प्रवेशही दिला जात नाही. या बाबतची खंत राष्ट्रकुल पदकविजेती सोनाली तोडकर आणि राष्ट्रीय महिला कुस्तीपटू प्रियांका सणस यांनी व्यक्त केली.

‘हरयाणातील लोकांनी आपली मानसिकता बदलली, पण आपल्या राज्यातील मानसिकता अजूनही जुनीच आहे. आम्हा मुलींना अजूनही आखाडय़ांमध्ये प्रवेश दिला जात नाही. मुलांशी सराव आम्ही शहरामध्ये करत असतो, पण ग्रामीण भागात असे होताना दिसत नाही. यामधे बदल घडायला हवा,’ असे सोनाली म्हणाली.

‘पुणे आणि कोल्हापूर मध्ये आम्ही सराव करण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला आखाडय़ात प्रवेश करायला दिला नाही. मुली आखाडय़ात आल्यावर मुलांचे लक्ष विचलित होत़े, असे आम्हाला सांगण्यात येत होते. आमचे प्रशिक्षक हनुमान जाधव यांनी त्यांना सांगून थोडा बदल घडवला. पण आखाडय़ातील पुरुषी मानसिकता बदलायला हवी. हा बदल घडला तरच आपल्याकडच्या मुली आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी होऊ शकते,’ असे प्रियांका सांगत होती.

प्रशिक्षक हनुमान जाधव यांनी या वेळी सांगितले की, ‘बऱ्याच आखाडय़ात अजूनही मुलींना प्रवेश नाकारला जातो. काही आखाडय़ांमध्ये मी स्वत जाऊन काही गोष्टी बदलल्या आहेत. आपल्याकडे साक्षीसारखे खेळाडू घडवायचे असतील तर सर्वप्रथम आपण पुरुषी मानसिकता बदलायला हवी.’