वृत्तसंस्था, टोक्यो

अन्य खेळाडूंच्या अपयशी कामगिरीनंतर तमाम भारतीय क्रीडा चाहत्यांच्या अपेक्षांच्या ओझ्याचे दडपण घेत तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्रा जागतिक अजिंक्यपद अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत आज, बुधवारी मैदानात उतरेल. गतविजेत्या नीरजला सर्वप्रथम पात्रता फेरीचा अडथळा पार करावा लागेल.

यंदाच्या हंगामात नीरजला विजेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली आहे. कारकीर्दीमधील ९० मीटरच्या स्वप्नपूर्तीनंतर नीरजची फेक ८८ ते ८९ मीटरच्या आसपास मर्यादित राहिली आहे. सर्वाधिक सातत्य जर्मनीच्या ज्युलियन वेबरने राखले असून, त्याने तीन वेळा ९० मीटरहून अधिक अंतर गाठले आहे.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकारातील विजेतेपद टिकविणारा केवळ तिसरा खेळाडू बनण्याचे उद्दिष्ट घेऊन नीरज मैदानात उतरेल, तेव्हा त्याच्यासमोर पॅरिस ऑलिम्पिक विजेता पाकिस्तानचा अर्शद नदीम, जर्मनीचा डायमंड लीग विजेता वेबर यांचे तगडे आव्हान असेल. जागतिक स्पर्धेत यापूर्वी यान झेलेझ्नी (१९९३, १९९५) आणि अँडरसन पीटर्स (२०१९, २०२२) या दोघांनाच जागतिक विजेतेपद टिकवता आले आहे. झेलेझ्नी सध्या नीरजचे प्रशिक्षक आहेत.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकताना नीरजला सलग दुसऱ्या सोनेरी यशापासून वंचित ठेवले होते. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी नीरज निश्चित प्रयत्न करेल. अर्थात, नदीम पॅरिसनंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत आहे. पात्रता फेरीत दोघांना वेगवेगळ्या गटांतून स्थान देण्यात आल्यामुळे अंतिम फेरीतच दोघे समोरासमोर येतील.

अंतिम फेरी गाठण्यासाठी ८४.५० मीटर अंतराचा निकष ठेवण्यात आला आहे. हे अंतर गाठणारे खेळाडू १२ जणांच्या अंतिम फेरीसाठी थेट पात्र ठरतील. त्यापेक्षा कमी खेळाडूंनी हे अंतर गाठल्यास, उर्वरित खेळाडूंमधून सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना अंतिम फेरीत संधी मिळेल.

४ यंदा प्रथमच भारताचे चार खेळाडू या एकाच स्पर्धाप्रकारासाठी पात्र ठरले आहेत. नीरजसह सचिन यादव, यशवीर सिंग आणि रोहित यादव हे अन्य तीन भारतीय भालाफेकीत आपले कौशल्य पणाला लावतील.

सर्वेश कुशारे सहावा : पुरुषांच्या उंच उडीत भारताच्या सर्वेश कुशारे याने अंतिम फेरीत पदकापर्यंत पोहोचण्याचे चांगले प्रयत्न केले, मात्र त्याला २.२८ मीटरच्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. सर्वेशने २.३१ मीटरसाठी नंतर प्रयत्न केले, पण तीनपैकी एकाही प्रयत्नात तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला स्पर्धेबाहेर जावे लागले. न्यूझीलंडच्या हेमिश करने २.३६ मीटरच्या उडीसह सुवर्णपदक जिंकले.