वेगवान माऱ्याला साथ देणाऱ्या खेळपट्टय़ांवर शिखर धवनच्या तंत्राबाबत बऱ्याचदा साशंकतेने पाहिले जाते. परंतु ‘आयसीसी’ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी सज्ज होणाऱ्या धवनने माझ्या आयुष्यात नकारात्मकतेला मुळीच स्थान नाही, असे स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भारताच्या सलामीची धुरा वाहणाऱ्या धवनने २०१३ आणि २०१७च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लिश वातावरणात उत्तम फलंदाजी केली होती. याशिवाय २०१५च्या विश्वचषकात तो भारताचा सर्वात यशस्वी फलंदाज ठरला होता.

‘‘आयसीसीच्या महत्त्वाच्या स्पर्धामधील माझी कामगिरी बरेच जण मला कौतुकाने सांगतात. परंतु या स्पर्धाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन आजही तसाच आहे. प्रयत्नांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा कधीच कमतरता नसते. प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित करतो. त्यामुळेच आगामी विश्वचषक स्पर्धेत माझ्याकडून उत्तम कामगिरी साकारली जाईल,’’ असा विश्वास धवनने व्यक्त केला.

यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट हंगामात ३३ वर्षीय धवनने दिल्ली कॅपिटल्सचे प्रतिनिधित्व करताना एकूण ५२१ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथे स्थान मिळवले.

‘‘दडपण मी कधीच बाळगत नाही. ते झुगारण्याची क्षमता माझ्याकडे आहे. टीकाकारांना आपले काम करू दे. मी पाच-दहा सामन्यांत धावा करू शकलो नाही, तर माझ्यासाठी सर्वस्व गमावल्याप्रमाणे काहीच घणार नाही. मी कोणत्या धाटणीचा खेळाडू आहे, याची मला पूर्ण जाणीव आहे,’’ असे धवनने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Negativeness is not a place in life says dhawan
First published on: 15-05-2019 at 01:36 IST