फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीचा दुसरा सामना बुधवारी मध्यरात्री रंगेल. या सामन्यात कोण विजयी होईल, याबाबत सट्टेबाजही साशंक आहेत. त्यामुळेच सट्टेबाजांनी नेदरलँड्सऐवजी अर्जेटिनालाच पसंती दिली असली तरी भावामध्ये फारसा फरक दिलेला नाही. या सामन्यासाठी सट्टेबाजांनी अर्जेटिनाला ७५ पैसे (६/४) तर नेदरलँड्सला सव्वा रुपया (१२/५) देऊ केला आहे. हा सामना चुरशीचा होईल असाही सट्टेबाजांचा होरा आहे. हा सामना निर्धारित वेळेत अनिर्णीत राहील, यासाठी सट्टेबाजांनी अडीच रुपये देऊ केले आहेत. पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळेल, या बाजूनेही अनेकांनी सट्टा लावला आहे. किती फरकाने अर्जेटिना वा नेदरलँड्स हा सामना जिंकेल, यावरही सट्टेबाजारात जोरदार उलाढाल झाल्याचे सांगण्यात येते. सामना प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर हे भाव पुन्हा बदलण्याची शक्यता आहे. आतापर्यंत चांगला खेळ करणाऱ्या नेदरलँड्सच्या बाजूने काही पंटर्सनी कौल दिला आहे. सट्टेबाजही संदिग्धपणे वावरत आहेत. आंतरराष्ट्रीय सट्टाबाजारातही या दोन्ही संघांना बऱ्यापैकी भाव देण्यात आला आहे. अंतिम फेरीत कोण पोहोचेल, यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सट्टा घेतला जाणार आहे. सर्वाधिक गोलकर्ता म्हणून थॉमस म्युलरकडे सट्टेबाजांचे लक्ष आहे. मात्र तूर्तास जेम्स रॉड्रिगेझच आघाडीवर आहे.
आजचा भाव :
नेदरलँड्स : सव्वा रुपया (१२/५)
अर्जेटिना : ७५ पैसे (६/४)