Ben Stokes in IND vs ENG Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना अनिर्णित राहिला आहे. मँचेस्टर येथे खेळवण्यात आलेल्या या कसोटीत भारताच्या फलंदाजांनी उत्तम फलंदाजी करत पराभव टाळला. आता दोन्ही संघ ओव्हलच्या मैदानावर मालिकेतील अखेरचा कसोटी सामना खेळतील. दरम्यान, मँचेस्टर कसोटी सामन्याच्या अखेरच्या काही षटकांमध्ये इंग्लंडचा संघ चांगली खेळभवाना दाखवू शकला नाही. त्यामुळे बेन स्टोक्स व त्याच्या सहकाऱ्यांवर टीका होत आहे. रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर शतकाच्या जवळ पोहोचलेले असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने भारतीय संघापुढे सामना लवकर संपवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, भारतीय कर्णधाराने तो प्रस्ताव फेटाळला.

बेन स्टोक्स सातत्याने सामना लवकर संपवण्यासाठी प्रयत्न करत होता. जडेजा ८९ धावांवर व सुंदर ८० धावांवर खेळत असताना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स जडेजाबरोबर हात मिळण्यासाठी पुढे गेला. याचा अर्थ दोन्ही संघांच्या संमतीने हा सामना अनिर्णित होत इथेच संपल्याचे जाहीर करता येईल. परंतु, जडेजाने मात्र या गोष्टीसाठी नकार दिला. इंग्लंडचे सर्व खेळाडू जडेजासमोर घोळका करून जडेजाची मनधरणी करत होते. तर, जॅक क्रॉऊली जडेजाशी थेट वाद घालू लागला. परंतु, जडेजाने त्यास नकार दिला.

स्टोक्स आणि त्याची टीम एवढ्यावरच थांबली नाही. काही वेळाने जडेजाचं शतक पूर्ण झालं. तर, वॉशिंग्टन सुंदर शतकाजवळ येवून पोहोचला होता. बेन स्टोक्सने पुन्हा एकदा सामना संपवण्यासाठी जडेजाकडे विचारणा केली. मात्र, जडेजा व सुंदरने त्यास नकार दिला. त्यानंतर सुंदरने त्याचं शतक पूर्ण केलं. शतकानंतर भारतीय संघाने सामना संपवण्याचा प्रस्ताव स्वीकारला.

इंग्लंडचा संघ व कर्णधार स्टोक्सवर टीका

या सामन्यात इंग्लंडचा संघ ‘जंटलमन’प्रमाणे खेळला नसल्याची टीका होत आहे. तसेच क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक खेळाडूंनी, कर्णधारांनी उत्तम खेळभावना दाखवलेल्या घटनांची उदाहरणं समाजमाध्यमांवर शेअर केली जात आहे. ही उदाहरणं पाहून बेन स्टोक्स व त्याच्या टीमने धडा घ्यावा असा सल्लाही दिला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेटकऱ्यांनी ३९ वर्षे जुनी घटना सांगत बेन स्टोक्सला शिकवला ‘जंटलमन्स गेम’

पोर्ट ऑफ स्पेन येथे १६ मार्च १९८४ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी सामना खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ हा सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी ठरला होता. या सामन्याच्या पाचव्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा संघ दुसरा डाव खेळत होता. सामना अनिर्णित राहणार हे जवळपास निश्चित होतं. मात्र, ऑस्ट्रेलियाचा सामना थांबवण्याच्या मनःस्थितीत नव्हता. कारण अ‍ॅलन बॉर्डर शतकाजवळ पोहोचले होते. त्याचवेळी वेस्ट इंडिजचे कर्णधार व्हिव रिचर्ड्स स्वतःहून बॉर्डर यांना म्हणाले, “तुझं शतक लवकर पूर्ण कर आणि मग आपण सगळे इथून जाऊया”. बॉर्डर यांनी २६९ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १०० धावा पूर्ण केल्या आणि त्यानंतर सामना संपवत असल्याची घोषणा केली.