Nicholas Pooran Announces Shocking Retirement: वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पुरनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. वयाच्या २९व्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला आहे. निकोलस पुरनच्या निवृत्तीच्या निर्णयाने सर्वच क्रिकेटप्रेमींना धक्का बसला आहे. आधुनिक क्रिकेटमधल्या तडाखेबंद फटकेबाजी करणाऱ्या फलंदाजांमध्ये पूरनचा समावेश होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो फ्रँचायझी क्रिकेट मात्र खेळत राहणार आहे. निकोलस पुरनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपल्या निर्णयाची माहिती चाहत्यांनी दिली आहे.

वेस्ट इंडिजच्या टी-२० तसंच एकदिवसीय संघाचा महत्त्वाचा भाग असलेल्या पूरनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द सुमारे नऊ वर्षांची होती. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध वेस्ट इंडिजसाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने २०१६ मध्ये वेस्ट इंडिजसाठी टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. पूरनची आक्रमक फलंदाजी आणि विकेटकीपिंगमुळे तो संघाचा एक महत्त्वाचा भाग बनला. पूरनने वेस्ट इंडिजसाठी एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या.

निकोलस पुरनची भावुक पोस्ट शेअर करत निवृत्तीची घोषणा

निकोलस पुरनने सोशल मीडियावर वेस्ट इंडिजच्या जर्सीमधील फोटोसह एक कॅप्शन लिहित ही भावुक पोस्ट शेअर केली. त्या फोटोवर लिहिलं आहे की, “सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी… मी खूप विचार केल्यानंतर, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या या आवडत्या खेळाने खूप काही दिलं आहे आणि पुढेही देत ​​राहील – आनंद, अनेक आठवणी आणि वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी.”

“मरुन रंगाची जर्सी परिधान करणं, राष्ट्रगीतासाठी उभे राहणं आणि मैदानावर पाऊल ठेवताना प्रत्येक वेळी सर्वस्व देऊन कामगिरी करणं… या सर्व गोष्टी माझ्यासाठी किती महत्त्वाच्या आहेत हे शब्दात सांगणं अवघड आहे. कर्णधार म्हणून संघाचं नेतृत्व करणे हा एक सन्मान आहे जो मी नेहमीच माझ्या हृदयात ठेवेन. चाहत्यांच्या अपार प्रेमाबद्दल त्यांचे आभार. तुम्ही कठीण काळात मला साथ दिली आणि चांगले क्षण उत्साहाने साजरे केले. माझ्याबरोबर या प्रवासात साथ दिल्याबद्दल माझे कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांचे आभार. तुम्हा सगळ्यांच्या पाठिंब्यामुळे ही वाटचाल शक्य होऊ शकली.”, असं म्हणत निकोलस पुरनने निवृत्ती जाहीर केली.

तर या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, “हा निर्णय घेणं खूप अवघड होतं, पण मी याचा खूप जास्त विचार केला. सर्वांना खूप प्रेम निकी पी. (निकोलस पुरन)”. पुरनला निकी पी या नावाने देखील ओळखलं जातं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूरनने वेस्ट इंडिजसाठी ६१ एकदिवसीय सामन्यांमध्ये ३९.६६ च्या सरासरीने १९८३ धावा केल्या, ज्यामध्ये ३ शतकं आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तर, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने १०६ सामन्यांमध्ये २२७५ धावा केल्या, यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट १३६.३९ होता. याशिवाय, तो एक उत्कृष्ट यष्टिरक्षक देखील आहे.