नवी दिल्ली : निषाद कुमार आणि सिमरन शर्मा यांनी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत अनुक्रमे उंच उडी आणि १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावले. भारताने एकाच दिवशी चार पदकांची कमाई करताना पदकतालिकेत चौथ्या स्थानावर झेप घेतली.

भारताला अन्य दोन पदके प्रीती पाल (२०० मीटर) आणि प्रदीप कुमार (थाळी फेक) यांनी मिळवून दिली. दोघेही कांस्यपदकाचे मानकरी ठरले. भारताची आता सहा सुवर्ण, पाच रौप्य आणि चार कांस्यपदके झाली आहेत. स्पर्धेचे दोन दिवस शिल्लक असून, भारताला सर्वोत्तम कामगिरीची अपेक्षा आहे. यापूर्वी २०२४ मधील स्पर्धेत भारताने एकूण १७ पदके मिळवली होती. ब्राझील, चीन, जपान पहिल्या तीन क्रमांकावर कायम आहेत.

महिलांच्या ‘टी १२’ विभागात सिमरन हिने १०० मीटर धावण्याची शर्यत जिंकताना ११.९५ सेकंद अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ दिली. गेल्या वर्षी सिमरन २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक विजेती होती. पॅरिस पॉरालिम्पिक स्पर्धेत ती कांस्यपदकाची मानकरी ठरली होती. चीनची लियांग यानफेन रौप्य, तर स्पेनची नागोर फोलगाडो कांस्यपदकाची मानकरी ठरली.

निषादने आपल्या २६व्या वाढदिवशी पुरुषांच्या ‘टी ४७’ विभागात उंच उडीत सोनेरी यश मिळविले. त्याने २.१४ मीटरच्या आशियाई विक्रमासह हे यश संपादन केले. त्याने टोकियो आणि पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये प्रत्येकी एक रौप्य, २०१९ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत एक कांस्य आणि २०२३ च्या आवृत्तीत एक रौप्यपदक मिळविले होते.

महिलांच्या ‘टी ३५’ विभागात २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत प्रीती ३०.३३ सेकंद या हंगामातील सर्वोत्तम वेळेसह कांस्यपदकाची मानकरी ठरली. चीनच्या गुओ कियानकियान हिने २९.५० सेकंद वेळ देत सुवर्णपदक मिळवले. इराकच्या फातिमा सुवेदला रौप्यपदक मिळाले.

पुरुषांच्या ‘एफ ६४’ विभागातील थाळीफेक प्रकारात प्रदीपने (४६.३३ मीटर) कांस्यपदक मिळवले. क्रोएशियाचा इव्हान कॅटानुसिक (५५.१२ मीटर) सुवर्णपदकाचा, तर अमेरिकेचा मॅक्स रोहन रौप्यपदकाचा मानकरी ठरला.