Nitish Rana Statement on Vaibhav Suryavanshi Age: वैभव सूर्यवंशीने आयपीएल २०२५ मध्ये आपल्या वादळी फटकेबाजीने आणि गगनचुंबी षटकारांच्या मदतीने आपली वेगळी ओळख निर्माण केली. फक्त आयपीएलचं नाही तर अंडर-१९ आणि भारताच्या अ संघाकडून खेळतानाही त्याने विक्रमी खेळी केल्या आहेत. अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची फटकेबाजी पाहून त्याच्या वयाबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. यादरम्यान आता भारताच्या खेळाडूने आणि राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेल्या नितीश राणाने मोठं वक्तव्य केलं आहे.

आयपीएल २०२५ मध्ये, वैभवने ऐतिहासिक खेळी करत आपल्या कामगिरीची छाप पाडली. त्याने फक्त ३८ चेंडूत १०१ धावा करत दणदणीत शतक झळकावून चाहत्यांची मनं जिंकली. याशिवाय आयपीएलच्या इतिहासातील सर्वात कमी वयात शतक झळकावण्याचा विक्रमही केला. आयपीएल इतिहासातील सर्वात जलद दुसऱ्या क्रमांकाची खेळी होती.

वैभव सूर्यवंशीसह आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग असलेल्या नितीश राणाने त्याच्या वयाबाबत आणि कामगिरीबाबत वक्तव्य केलं. अलिकडेच, नितीश राणाच्या नेतृत्वाखाली, वेस्ट दिल्ली लायन्सने दिल्ली प्रीमियर लीग २०२५ चे विजेतेपद पटकावले. या विजयानंतर, दिलेल्या मुलाखतीत राणाला त्याच्या राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंबद्दल चाहत्यांना माहित नसतील अशा गोष्टी सांगण्यास सांगितलं.

वैभव सूर्यवंशीबाबत नितीश राणा काय म्हणाला?

नितीश राणाला जेव्हा वैभव सूर्यवंशीबद्दल विचारलं गेलं तेव्हा हसत मस्करीत म्हणाला, “सूर्यवंशी खरंच १४ वर्षांचा आहे का?” पुढे नितीश राणाला संजू सॅमसनबाबत बोलताना म्हणाला, “पुढच्या वर्षी तो कोणत्या संघातून खेळणार आहे?” रियान परागबद्दल नितीश म्हणाला, “तो जसा दिसतो तसा खरंतर नाहीये. खऱ्या आयुष्यात तो खूप नम्र आहे आणि सर्वांशी तो खूप नीट बोलतो. त्याचं वागणं टीव्हीवर चुकीच्या पद्धतीने दाखवलं जातं. तो तसा नाहीये.”

आयपीएल २०२५ दरम्यान, वैभव सूर्यवंशीच्या वयावर अनेक वेळा प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. लिलावाच्या वेळी तो फक्त १३ वर्षांचा होता, तर या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण करण्यापूर्वी त्याने संघासह त्याचा १४ वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्याच्या वयावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण बीसीसीआयने त्याची बोन टेस्ट (हाडांची चाचणी) केली आहे. वैभव सूर्यवंशीचे वडील संजीव सूर्यवंशी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘जेव्हा तो साडेआठ वर्षांचा होता तेव्हा त्याने पहिल्यांदाच बीसीसीआयला बोन टेस्ट दिली होती. आम्हाला कोणाचीही भीती वाटत नाही. तो पुन्हा ‘वयाची चाचणी’ देत उत्तीर्ण होऊ शकतो.’