संदीप कदम, लोकसत्ता

मुंबई : ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला पुढील वर्षी जूनमध्ये सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी ‘आयपीएल’चे आयोजन केले जाणार आहे. तसेच जानेवारी महिन्यात भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध ट्वेन्टी-२० मालिकाही खेळणार आहे. त्यामुळे रोहित शर्मा पुन्हा ट्वेन्टी-२० खेळणार की नाही, या निर्णयाची घाई करण्याची अजिबातच आवश्यकता नसल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा म्हणाले. महिला प्रीमियर लीगसाठी (डब्ल्यूपीएल) मुंबईत पार पडलेल्या लिलावासाठी ते उपस्थित होते.

रोहितला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० व एकदिवसीय संघात स्थान न मिळाल्याने त्याच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यातच हार्दिक पंडय़ा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्त होण्यासाठी मेहनत घेत आहे. त्यामुळे संघाच्या नेतृत्वाबाबतही चर्चा होत आहे. हार्दिकबाबत विचारले असता शहा म्हणाले, ‘‘आम्ही हार्दिकच्या सुधारणेवर लक्ष ठेऊन आहोत. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) आहे आणि संघात पुनरागमन करण्यासाठी मेहनत घेत आहे. त्याच्या तंदुरुस्तीबाबत आम्ही वेळोवेळी माहिती देत राहू. तो कदाचित अफगाणिस्तान मालिकेपूर्वीही तंदुरुस्त होऊ शकतो.’’

हेही वाचा >>> WPL 2024 Auction : मुंबई इंडियन्सने लिलावात ‘या’ पाच खेळाडूंना केले खरेदी, शबनिम इस्माईल ठरली सर्वात महागडी

राहुल द्रविड आणि अन्य साहाय्यक प्रशिक्षकांचा कार्यकाळ वाढवला असला तरीही, त्यांच्या कालावधीबाबत स्पष्टता नाही. त्याबद्दल शहा यांनी सांगितले, ‘‘आम्ही सर्वांचा कार्यकाळ वाढवला आहे. मात्र, कराराचा कालावधी किती असेल हे अद्याप ठरवलेले नाही. विश्वचषक स्पर्धेमुळे आम्हाला यासाठी वेळ मिळाला नाही. संघ दक्षिण आफ्रिकेवरुन परतल्यानंतर आम्ही याबाबत निर्णय घेऊ.’’

मांडलेले अन्य मुद्दे

* ‘डब्ल्यूपीएल’ स्पर्धा फेब्रुवारीमध्ये घेण्याचा विचार.  खेळाडू आणि संघांच्या सोयीनुसार एका राज्यातच आमचा स्पर्धा घेण्याचा प्रयत्न.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* गुलाबी चेंडूने खेळविण्यात येणाऱ्या कसोटी सामन्याकरता चाहत्यांमध्ये आवड निर्माण केली पाहिजे. यापूर्वी भारतात गुलाबी चेंडूने खेळलेला कसोटी सामना दोन ते तीन दिवसांत संपला होता. सर्वांना हे सामने चार ते पाच दिवस खेळलेले पाहायचे आहेत. तसे झाल्यास आपल्याला गुलाबी चेंडूच्या कसोटीत वाढ करता येईल. * नवीन राष्ट्रीय क्रिकेट अकादमी बंगळूरु येथे सुरू होणार आहे. ईशान्य भारत आणि जम्मू-कश्मीर येथेही ऑगस्टच्या मध्यावर नवी अकादमी सुरू होतील.