क्रिकेटच्या तुलनेत अन्य खेळ बरेच मागे पडत चालले आहेत. त्यासाठी सरकार आणि सरकारचे क्रीडाधोरण कारणीभूत आहे, अशी टीका सर्वत्र होत असताना महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात खेळाचा उल्लेखच नसतो. बऱ्याचशा क्रीडा संघटनांवरील अध्यक्ष हे राजकीय नेते असले तरी कोणत्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात खेळांना अद्याप स्थान मिळालेले नाही. खेळांच्या बाबतीत मात्र राजकीय पक्षांचे धोरण ‘जैसे थे’ असेच आहे, असा सूर ‘लोकसत्ता लाऊडस्पीकर’ कार्यक्रमात ‘क्रिकेटचा अतिरेक होतोय का’ या विषयात मान्यवरांनी आळवला. क्रिकेटचा अतिरेक होतोय, यावर सर्वाचे शिक्कामोर्तब झाले तरी अन्य खेळांचा प्रसार आणि विकास अधिक व्यापक दृष्टिकोनातून होण्याची गरज आहे, यावर मान्यवरांचे एकमत झाले.
‘‘क्रिकेटचा अतिरेक होतोय, म्हणून क्रिकेटवर टीका करण्यापेक्षा अन्य खेळातील प्रशासकांनी आपला खेळ पुढे कसा आणता येईल, याचा विचार करणे गरजेचे आहे. क्रिकेट प्रशासकांनी क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले, तशाच प्रकारचे प्रयत्न अन्य खेळांसाठीही करायला हवेत. त्याचबरोबर पालकांची मानसिकता बदलायला हवी,’’ असे मत नेमबाजपटू आणि प्रशिक्षक शीला कनुंगो यांनी मांडले. ‘‘शाळेत जाणारी ३५ टक्के मुले ही मधुमेह, लठ्ठपणा आणि अनेक रोगांना बळी पडल्याचे एका तपासात निष्पन्न झाले आहे. शाळा, घर, क्लासेस, संगणक आणि व्हिडियो गेम्सच्या तावडीतून त्यांची सुटका करण्यासाठी मुलांनी मैदानात उतरण्याची गरज आहे,’’ असे सांगत मैदान बचाव समितीचे अध्यक्ष भास्कर सावंत यांनी सद्यस्थितीची जाणीव करून दिली.
‘‘क्रिकेटने कालानुरूप आपले रंग बदलले. मार्केटिंग, विश्लेषणाचे तंत्र, पुरस्कर्ते अशा अनेक आघाडय़ांवर अन्य खेळ मागे पडले. आता संघटक, प्रशासक, खेळाडू आणि पालक या सर्वानी हातात हात घालून आपला खेळ वाढवला पाहिजे, याची जबाबदारी उचलायला हवी,’’ असे क्रीडा मानसतज्ज्ञ आणि मल्लखांब प्रशिक्षिका नीता ताटते यांनी सांगितले. या कार्यक्रमात मुंबई खो-खो संघटना आणि मुंबई शहर लंगडी संघटनेचे प्रमुख कार्यवाह अरुण देशमुख, क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू गौरी वाडेकर हे उपस्थित होते.
(सविस्तर वृत्त रविवारच्या अंकात..)
संग्रहित लेख, दिनांक 20th Dec 2012 रोजी प्रकाशित
राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात खेळांना स्थानच नाही!
क्रिकेटच्या तुलनेत अन्य खेळ बरेच मागे पडत चालले आहेत. त्यासाठी सरकार आणि सरकारचे क्रीडाधोरण कारणीभूत आहे, अशी टीका सर्वत्र होत असताना महाराष्ट्रातील कोणत्याही राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात खेळाचा उल्लेखच नसतो.

First published on: 20-12-2012 at 07:46 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No place for sports in political party declaration