Dinesh Lad Statement On Rohit Sharma Test Retirement: भारताचा कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहितने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून स्टोरी शेअर करून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. विराट कोहलीने कसोटी संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर ही जबाबदारी रोहितकडे सोपवण्यात आली होती. रोहितने ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली. मात्र, गेल्या २ मालिकांमध्ये भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. यादरम्यान रोहितची वैयक्तिक कामगिरीही फारशी चांगली नव्हती. त्यामुळे रोहितने निवृत्ती घेतली असावी, अशी चर्चा सुरू आहे. मात्र, आता त्याच्या बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितने निवृत्ती का घेतली? यामागचं कारण सांगितलं आहे.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये दमदार सुरूवात केली होती. मात्र, २०२४-२५ वर्षांत त्याच्या कामगिरीचा आलेख घसरला. या एका वर्षांतील कामगिरी पाहिली, तर त्याला ८ सामन्यांमध्ये अवघ्या १८६ धावा करता आल्या आहेत. ज्याच न्यूझीलंडविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेचा आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीचा समावेश आहे. या दोन्ही मालिका भारतीय संघासाठी अतिशय महत्वाच्या होत्या. या मालिका जिंकून भारताकडे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठण्याची संधी होती. मात्र आता रोहित वनडे क्रिकेटला प्राधान्य देणार असल्याचं दिनेश लाड यांनी सांगितलं.
काय म्हणाले दिनेश लाड?
दिनेश लाड यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “रोहितने हा निर्णय घाईत घेतलेला नाही. त्याने जाणीवपूर्वक आणि विचार करून हा निर्णय घेतला आहे. तो फॉर्ममध्ये नाही, म्हणून त्याने हा निर्णय घेतला असावा असंही काही नाही. त्याला जे योग्य वाटलं त्याने ते केलं. या निर्णयाचा इंग्लंड दौऱ्याशी काहीही संबंध नाही. पुढच्या पिढीला संधी मिळावी म्हणून त्याने हा निर्णय घेतला आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, ” त्याचे लक्ष्य वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप होते. मात्र दुर्देवाने आपण अंतिम फेरीत प्रवेश करू शकलो नाही. आता पुढचं लक्ष्य वनडे वर्ल्डकप २०२७ आहे. त्याने हा वर्ल्डकप जिंकल्यानंतर निवृत्ती घ्यावी अशी माझी ईच्छा आहे.”
रोहितने कसोटी क्रिकेटला रामराम केला आहे, पण तो वनडे क्रिकेट खेळणं सुरू ठेवणार आहे. यावरून हे स्पष्ट होत आहे की, रोहित २०२७ चा वनडे वर्ल्डकप खेळू शकतो. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये १२ शतकांसह ४३०१ धावा केल्या. आयसीसी टी-२० वर्ल्डकप झाल्यानंतर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला होता.
आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याचं संपूर्ण लक्ष वनडे क्रिकेटवर असणार आहे. आगामी वनडे वर्ल्डकप जिंकून त्याच्याकडे धोनीच्या तिन्ही आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी असणार आहे.