अनेक ग्रँडस्लॅम विजेतेपद नावावर असणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिच याच्या अनुपस्थितीत उतरलेल्या सर्बियाविरुद्ध भारताला डेव्हिस चषक टेनिस लढतीत विजयाची संधी आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या या लढतीत प्रज्ञेश गुणेश्वरनवर भारताची मोठी जबाबदारी असेल. अमेरिकन स्पर्धेत नुकतेच विजेतेपद मिळवणाऱ्या जोकोव्हिचने या लढतीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या जागी फिलिप क्राजिनोविकला सर्बियाच्या संघात स्थान देण्यात आले आहे.

भारतालाही युकी भांब्रीची अनुपस्थिती जाणवणार आहे. दुखापतीमुळे युकीने या लढतीमधून माघार घेतली आहे. त्याच्या जागी डावखुरा खेळाडू प्रज्ञेशकडून मोठी अपेक्षा आहे. त्याने नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील एकेरीत कांस्यपदक पटकावले होते. प्रज्ञेशने जागतिक प्ले-ऑफ विभागात भारतास स्थान मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता.

रामकुमार रामनाथनवरही भारताची भिस्त आहे. त्याने गेल्या १२ महिन्यांमध्ये अनेक स्पर्धामध्ये सनसनाटी कामगिरी केली आहे. जागतिक क्रमवारीत त्याला १३५वे स्थान आहे.

अमेरिकन खुल्या स्पर्धेतील उपविजेता खेळाडू मार्टिन डेल पोत्रोवर नुकत्याच झालेल्या माद्रिद खुल्या स्पर्धेत विजय मिळवणारा दुसान लाजोविकवर सबिर्यची मदार आहे. जागतिक क्रमवारीत त्याला ५६वे स्थान आहे. रामकुमारने यापूर्वी त्याच्यावर मात केली आहे. एकेरीतील अन्य लढतीत लास्लो दिजेरे हा सर्बियाचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याला डेव्हिस लढतींचा फारसा अनुभव नाही. केवळ दोनच सामन्यांमध्ये त्याने भाग घेतला आहे.

‘‘जोकोव्हिच याच्या अनुपस्थितीचा आम्हाला लाभ मिळणार आहे. मात्र गाफील न राहता प्रत्येकाने स्वत:च्या क्षमतेइतकी सर्वोच्च कामगिरी करणे आवश्यक आहे,’’ असे भारतीय संघाचा न खेळणारा कर्णधार महेश भूपतीने सांगितले.

जोकोव्हिच हा खेळणार नसल्यामुळे आमचा आत्मविश्वास उंचावला आहे. आम्हाला या लढतीत विजय मिळवण्याची भरपूर संधी आहे. मात्र त्यासाठी प्रत्येक खेळाडूवर नैतिक जबाबदारी असणार आहे. सामन्यातील प्रत्येक संधीचा लाभ उठवणे महत्त्वाचे असेल    – प्रज्ञेश गुणेश्वरन