फ्रेंच ओपन : झुंजार त्सित्सिपासला नमवत लढवय्या जोकोव्हिचनं पटकावलं १९वं ग्रँडस्लॅम जेतेपद

जोकोव्हिचनं उपांत्य फेरीत नदालला हरवत अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

Novak Djokovic wins french open final 2021
नोव्हाक जोकोव्हिचने जिंकले फ्रेंच ओपन २०२१ स्पर्धेचे जेतेपद

एकीकडे यूरो कप स्पर्धा रंगत असताना दुसरीकडे टेनिस चाहत्यांना रविवारी फ्रेंच ओपनचा थरार अनुभवायला मिळाला. ग्रीसचा २२ वर्षाचा टेनिसपटू स्टेफानोस त्सित्सिपास आणि जगातील प्रथम क्रमांकाचा सर्बियाचा टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच पुरुष एकेरीतील अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकले होते. सुरुवातीचे दोन सेट गमावलेल्या जोकोव्हिचने उर्वरित सामन्यात सर्व अनुभव पणाला लावत पुनरागमन केले. पाच सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात जोकोव्हिचने त्सित्सिपासला ६-७, २-६, ६-३, ६-२, ६-४ असे हरवत फ्रेंच ओपनचे दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले.

राफेल नदाल, रॉजर फेडरर याआधीच स्पर्धेबाहेर झाल्याने जोकोव्हिचसाठी फ्रेंच ओपनचा अंतिम सामना सोपा जाईल असेल वाटत होते, मात्र, युवा त्सित्सिपासने त्याला बरेच थकवले. तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ चाललेल्या सामन्यात त्सित्सिपासने झुंजार कामगिरीचे प्रदर्शन केले. सुरुवातीचे दोन सेट मोठ्या फरकाने जिंकल्यानंतर त्सित्सिपासचा आत्मविश्वास दुणावला होता. मात्र, जोकोव्हिचने तिसरा सेटमध्ये आक्रमक खेळ करत ६-३ असा सेट जिंकला. त्यानंतर पुढच्या दोन सेटमध्ये त्सित्सिपासने चुका केल्या, ज्याचा फायदा जोकोव्हिचने उचलला. अंतिम सामन्यात त्सित्सिपासने पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत उशीर झाला.

 

 

उपांत्य फेरीत जोकोव्हिचची नदालवर मात

लाल मातीच्या कोर्टवरील अनभिषिक्त सम्राट ही ख्याती असणारा राफेल नदाल आणि  नोव्हाक जोकोव्हिच यांच्यातील  उपांत्य लढत टेनिसरसिकांसाठी अत्युच्च दर्जाची मेजवानी ठरली होती. चाहत्यांना या दोघांमधील सामन्याद्वारे चार सेटमध्ये चार तास, ११ मिनिटे रंगलेला थरार अनुभवता आला. नदालविरुद्ध विजय म्हणजे जणू माऊंट एव्हरेस्ट शिखर सर केल्याचीच अनुभूती आहे, अशा शब्दांत जोकोव्हिचने विजयाचे विश्लेषण केले होते.

त्सित्सिपासचा पराक्रम

दुसरीकडे त्सित्सिपासने उपांत्य फेरीत जर्मनीच्या अलेंक्झांडर ज्वेरेवला हरवले होते. तब्बल पावणेचार तास रंगलेल्या सामन्यात त्सित्सिपासने ज्वेरेवला ६-३, ६-३, ४-६, ४-६, ६-३ अशी मात दिली होती. फ्रेंच ओपनच्या अंतिम सामन्यात पोहोचताच त्सित्सिपासने नवा विक्रम नोंदवला होता.

यापूर्वी जोकोव्हिच आणि त्सित्सिपास सात वेळा आमनेसामने आले होते, त्यात पाच वेळा जोकोव्हिचने तर त्सित्सिपासने दोन वेळा बाजी मारली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Novak djokovic wins french open final 2021 adn