गहुंजे येथील सहारा सुब्रतो रॉय स्टेडियमवर गुरुवारी होणाऱ्या इंग्लंड व भारत यांच्यातील ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात धावांचा पाऊस पहावयास मिळेल असा अंदाज तेथील क्युरेटर पांडुरंग साळगावकर यांनी व्यक्त केला.
गहुंजे येथील खेळपट्टी ‘खेळकर’ राहणार असली तरी फलंदाजांना तेथे आपले कौशल्य चांगल्या रितीने दाखविता येईल. या स्टेडियमवर यंदा आतापर्यंत झालेल्या रणजी सामन्यांमध्ये तेथील खेळपट्टी फलंदाजांसाठी नंदनवन ठरली आहे. ट्वेन्टी-२० सामन्यात प्रेक्षकांना चौकार व षटकारांचा पाऊस अपेक्षित असतो आणि गुरुवारी होणाऱ्या या सामन्यातही प्रेक्षकांची ही अपेक्षा पूर्ण होईल, असे साळगावकर यांनी सांगितले. प्रथम फलंदाजी करणारा संघ २० षटकांमध्ये पावणेदोनशे धावांचा पल्ला गाठेल असाही आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान या सामन्याच्या तिकीटविक्रीस चांगला प्रतिसाद मिळत आहे. ७५० रुपयांची तिकिटे यापूर्वीच संपली आहेत. डेक्कन जिमखाना क्लब, पीवायसी हिंदू जिमखाना, महाराष्ट्र क्रिकेट संघटना आदी ठिकाणी ही विक्री सुरू आहे.