Kane Williamson run out video viral : न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात धावबाद झाला. त्याला खातेही उघडता आले नाही. २०१२ नंतर तो प्रथमच कसोटी क्रिकेटमध्ये धावबाद झाला आहे. सहकारी फलंदाज विल यंगशी समन्वय साधण्यात अपयशी ठरल्याने विल्यमसन धावबाद झाला. त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

न्यूझीलंडच्या डावातील ५व्या षटकात केन विल्यमसन धावबाद झाला. मिचेल स्टार्क हे षटक टाकत होता. त्याच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर विल्यमसन मिडऑफच्या दिशेने शॉट खेळला आणि धाव घेण्यासाठी धावला. पण, नॉन स्ट्रायकर एंडला उभ्या असलेल्या विल यंगची नजर चेंडूवर होती. यामुळे त्याला क्रीज सोडण्यास उशीर झाला. पण, विल्यमसनने वेगाने धाव घेतली. पण, समन्वयाअभावी दोन्ही फलंदाज एकमेकांना धडकले. दरम्यान, मार्नस लॅबुशेनने चेंडू पटकन पकडला आणि तो थेट स्टंपवर मारला आणि विल्यमसन धावबाद झाला.

अशाप्रकारे केन विल्यमसन खाते न उघडताच बाद झाला. विल्यमसनला त्याच्या सहकाऱ्याशी टक्कर झाल्यानंतर दुखापत झाली. त्यामुळे तो लंगडत मैदानाबाहेर गेला. त्याच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्ट दिसत होती. विल्यमसन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या ६ कसोटींमध्ये त्याने पाच शतकं झळकावली आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत त्याने तीन शतकं झळकावली होती.

हेही वाचा – Sourav Ganguly : “…म्हणून मी रोहित शर्माला कर्णधार बनवलं होतं”, सौरव गांगुलीचा ‘हिटमॅन’बद्दल मोठा खुलासा

केन विल्यमसन त्याच्या १४ वर्षांच्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा धावबाद झाला आहे. यापूर्वी तो झिम्बाब्वेविरुद्ध दोनदा धावबाद झाला होता. आता तो १२ वर्षानंतर धावबाद झाला आहे. वेलिंग्टन कसोटीबद्दल बोलायचे तर, कॅमेरून ग्रीनच्या १७४ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३८३ धावा केल्या होत्या. शेवटच्या विकेटसाठी ग्रीनने जोश हेझलवूडसोबत विक्रमी शतकी भागीदारी केली. दोघामध्ये दहाव्या विकेटसाठी ११६ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली आणि संघाला ३८३ धावांपर्यंत मजल मारली.

ग्रीनने संपूर्ण संघापेक्षा केल्या जास्त धावा –

कॅमेरून ग्रीनच्या खेळीचे महत्त्व यावरून समजू शकते की संघाचे इतर १० फलंदाजही त्याने जितक्या धावा काढल्या तितक्या धावा करू शकले नाहीत. ग्रीनने १७४ धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियाच्या उर्वरित १० फलंदाजांनी १६८ धावा केल्या. ग्रीननंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज मिचेल मार्श ठरला. त्याने ४० धावांची खेळी केली. न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला अतिरिक्त ४१ धावांची भेट दिली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला १७९ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक ७१ धावांचे योगदाने दिले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर दुसऱ्या डावात २ बाद १३ धावा केल्या असून ख्वाजा आणि लायन नाबाद आहेत.