भारताचा गोल्डनबॉय आणि उत्तम भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. पावो नूरमी गेम्स २०२४ मध्ये त्याने गोल्डमेडलवर आपलं नाव कोरलं आहे. पहिल्यांदाच नीरज चोप्रा या खेळात सुवर्णपदक जिंकला आहे. २०२३ मध्ये नीरज या स्पर्धेत भाग घेऊ शकला नव्हता. तर २०२२ मध्ये त्याला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. मात्र मंगळवारी फिनलँड या ठिकाणी झालेल्या पावो नूरमी गेम्स स्पर्धेत (१८ जून) नीरज चोप्राने ८५.९७ मीटर दूर भाला फेकत सुवर्ण पदक जिंकलं आहे. नीरज चोप्राच्या या कामगिरीचं देशात कौतुक होतं आहे.

हे पण वाचा- भारताने जागतिक पातळीवरील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धाचे आयोजन करणे गरजेचे- नीरज चोप्रा

नीरज चोप्राने टोकियो ऑलिंपिक च्या दरम्यान भाला फेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला होता. आता २६ जुलै २०२४ पासून पॅरीसमध्ये ऑलिंपिक स्पर्धा सुरु होते आहे. अशात पावो नूरमी गेम्समध्ये नीरज चोप्राने केलेली कामगिरी ही त्याच्या चाहत्यांसाठी आणि भारतासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे. नीरजच्या नंतर त्याचा प्रतिस्पर्धी टोनी केरानेन याने ८४.१९ मीटर दूर भाला फेकला होता. त्याला रौप्य पदक देण्यात आलं आहे. तर ओलिवयर हेलांडरने ८३.९६ मीटर अंतरावर भाला फेकला त्याला कांस्य पदक देऊन गौरवण्यात आलं आहे.

एकूण सहा फेऱ्यांमध्ये कशी होती नीरजची कामगिरी?

स्पर्धेत एकूण सहा फेऱ्यांपैकी पहिल्या फेरीत नीरजने ८३.६२ मी., तर दुसऱ्या फेरीत ८३.४५ मी. भालाफेक केली. ८५.९७ मी. ची भालाफेक त्याची सर्वोच्च ठरली. चौथ्या फेरीत ८२.२१ मी. भाला फेकला पाचव्या फेरीत त्याचा फाऊल झाला. तर सहाव्या फेरीत ८२.९७ इतकी भालाफेक केली. भारताच्या नीरज चोप्राला ९० मीटर दूर भाला फेकता आलेला नाही. हा टप्पा ओलांडण्याचे लक्ष त्याने ठेवले आहे. परंतु, खांदा दुखीमुळे त्याला त्यात अडथळा येत आहे. जर्मनीच्या मॅक्स डेहनिंगने हॉल येथे झालेल्या स्पर्धेत ९०.२० मीटर भाला फेकून विक्रम नोंदवला होता. हा मॅक्सही फिनलँडमधील स्पर्धेत होता; पण त्याला फारशी चमकदार कामगिरी करता आली नाही.