वृत्तसंस्था, नवी दिल्ली
माजी ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते हॉकीपटू डॉ. वेस पेस यांचे गुरुवारी कोलकाता येथे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. नामांकित टेनिसपटू लिअँडर पेसचे वडील असणाऱ्या वेस यांनी हॉकीतून निवृत्त झाल्यानंतर प्रशासक म्हणूनही भारतीय क्रीडाक्षेत्राला मोठे योगदान दिले. तसेच ‘स्पोर्ट्स मेडिसिन’ अर्थात क्रीडा वैद्याकशास्त्रात त्यांचे कामही अत्यंत महत्त्वाचे ठरले. क्रीडा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचे दुर्मीळ मिश्रण म्हणून वेस यांच्याकडे पाहिले जायचे.
वेस गेल्या काही काळापासून पार्किन्सन आजारासह वयाशी संबंधित अनेक आजारांशी झुंजत होते. त्यांना मंगळवारी कोलकाताच्या सिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुरुवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. अत्यंत संयमी, मनमिळावू आणि बुद्धिमान व्यक्ती, अशी वेस यांची ओळख होती.
३० एप्रिल १९४५ मध्ये गोव्यात जन्मलेल्या वेस यांनी हॉकीपटू म्हणून यशस्वी कारकीर्द घडवली. म्युनिक येथे १९७२ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघात त्यांचा समावेश होता. निवृत्तीनंतर त्यांनी क्रीडा वैद्याकशास्त्रात महत्त्वाचे योगदान देत हॉकी, क्रिकेट, टेनिस आणि अगदी फुटबॉलपटूंनाही मदत केली. वेस यांनी ‘एमबीबीएस’ पदवी मिळवली होती. त्यांनी जनरल शस्त्रक्रिया, तसेच क्रीडा वैद्याकशास्त्रात विशेष काम केले.
भारतीय टेनिसमधील सर्वकालीन सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये गणना होणाऱ्या लिअँडर पेसच्या प्रथितयश कारकीर्दीत वडील वेस यांची भूमिका निर्णायक ठरली. त्यांनी अनेक वर्षे लिअँडरचे व्यवस्थापक (मॅनेजर), तसेच भारताच्या डेव्हिस चषक टेनिस संघाचे डॉक्टर म्हणूनही काम केले.
‘‘हॉकी कारकीर्दीनंतर वेस यांनी संपूर्ण लक्ष क्रीडा वैद्याकशास्त्रावर केंद्रित केले. त्याने अनेक भारतीय खेळाडूंना मदत केली होती,’’ अशी आठवण १९७२ सालच्या ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या हॉकी संघातील वेस यांचे सहकारी अजित पाल सिंह यांनी सांगितली. ‘‘भारतीय खेळांसाठी, विशेषत: हॉकीसाठी हा दु:खद दिवस आहे,’’ असेही अजित पाल म्हणाले.
असाही योगायोग
वेस आणि लिअँडर पेस या पिता-पुत्राने दोन वेगवेगळ्या खेळांत ऑलिम्पिक कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली होती. म्युनिक येथे १९७२ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय हॉकी संघात वेस यांचा समावेश होता. त्यानंतर २४ वर्षांनी म्हणजेच १९९६ साली अमेरिकेच्या अटलांटा येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये टेनिसच्या पुरुष एकेरीत लिअँडरने कांस्यपदकाची कमाई केली होती.
विविध खेळांशी नाते
हॉकीपटू म्हणून निवृत्त झाल्यानंतरही वेस क्रीडाक्षेत्राशी जोडलेले राहिले. त्यांनी १९९६ ते २००२ या कालावधीत भारतीय रग्बी युनियनचे अध्यक्ष म्हणून काम केले. ते अनेक वर्षे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) उत्तेजक सेवनविरोधी कार्यक्रमाचा भाग होते. वेस हे वैद्याकीय सल्लागार म्हणून ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबशीही जोडलेले होते. तसेच कलकत्ता क्रिकेट आणि फुटबॉल क्लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.