भारतीय संघाला नवीन स्पॉन्सरशीप मिळाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने(बीसीसीआय) दिलेल्या माहितीनुसार OPPO मोबाईल इंडिया प्रायव्हेट लिमिडेट कंपनीने भारतीय संघाच्या स्पॉन्सरशीपचे हक्के मिळवले आहेत. बीसीसीआयने ओप्पोसोबत पुढील पाच वर्षांसाठी करार केला असून येत्या १ एप्रिल २०१७ रोजी ओप्पोसोबतच्या कराराला सुरूवात होणार आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यात भारतीय संघ नव्या स्पॉस्नरशीपसह नव्या जर्सीत खेळताना दिसणार आहे. याआधी भारतीय संघाच्या स्पॉन्सरशीपचे अधिकार ‘स्टार इंडिया’कडे होते.

 

स्टारसोबतचा करार मार्च महिन्यात संपुष्टात येत असल्याने बीसीसीआयने याआधीच संघाच्या स्पॉन्सरशीप मिळविण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती. स्टार इंडियाने स्पॉन्सरशीपसाठी बोली न लावण्याचा निर्णय जाहीर केल्याने चॅम्पियन्स करंडक स्पर्धेआधी भारतीय संघाला नवा स्पॉन्सर मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात ‘पेटीएम’चे नाव सर्वात आघाडीवर होते. याशिवाय, रिलायन्सच्या ‘जिओ’चेही नाव आघाडीवर होते. अखेरीस ओप्पो कंपनीने बाजी मारत पुढील पाच वर्षांसाठी संघाच्या स्पॉन्सरशीपचे अधिकार प्राप्त केले आहेत.

बीसीसीआयने संघाच्या स्पॉन्सशीपसाठी पायाभूत किंमत (बेस प्राईस) यावेळी तब्बल ५३८ कोटी इतकी ठेवली होती. एप्रिल महिन्यापासून पुढील पाच वर्षात भारतीय संघ एकूण २५९ सामने खेळणार आहे. यातील २३८ सामने दोन संघांमध्ये, तर २१ आयसीसीच्या स्पर्धांचे सामने आहेत. येत्या जून महिन्यात चॅम्पियन्स करंडक, तर २०१९ साली विश्वचषक आणि २०२० साली ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या कालावधीत भारतीय संघाच्या टी-शर्टवर स्पॉन्सरशीपचे अधिकार मिळविण्यासाठी या कंपन्या उत्सुक होत्या.