वृत्तसंस्था, सिडनी

मुख्य प्रशिक्षकांना करारवाढ देण्याच्या निर्णयाविरोधात १५ खेळाडूंनी बंड केल्याच्या वर्षभरातच स्पेनच्या संघाने प्रथमच महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. रविवारी सिडनी येथे झालेल्या अंतिम लढतीत स्पेनने पूर्वार्धातील ओल्गा कार्मोनाच्या गोलच्या जोरावर इंग्लंडला १-० अशा फरकाने पराभूत केले.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रशिक्षक बदलण्याची मागणी राष्ट्रीय फुटबॉल संघटनेने फेटाळल्यानंतर स्पेनच्या १५ खेळाडूंनी यापुढे खेळण्यास नकार दिला होता. मात्र, त्यानंतर अगदी कमी कालावधीतच स्पेनने बहुतांश नवीन खेळाडूंसह संघाची पुनर्बाधणी करताना विश्वचषक जिंकण्याची किमया साधली. २००७ सालानंतर महिला विश्वचषक जिंकणारा स्पेन हा पहिलाच युरोपीय संघ ठरला आहे. त्यावेळी जर्मनीचा संघ विजेता ठरला होता. बंड केलेल्या १५ पैकी केवळ तीन खेळाडूंचा विश्वविजेत्या स्पेन संघात समावेश होता.

रविवारी सिडनीच्या ‘स्टेडियम ऑस्ट्रेलिया’ येथे ७५ हजारहून अधिक प्रेक्षकांसमोर झालेल्या अंतिम लढतीत स्पेनने अप्रतिम खेळ केला. कर्णधार कार्मोनाने २९व्या मिनिटाला डाव्या पायाने चेंडू गोलजाळय़ात मारला आणि स्पेनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. स्पेनच्या संघात बार्सिलोना क्लबकडून खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी असल्याने चेंडूवर ताबा मिळवणे, छोटे-छोटे पास देऊन चेंडू खेळवता ठेवणे यात स्पेनच्या खेळाडूंचा हातखंडा आहे. त्यामुळे स्पेनच्या खेळाडूंकडून चेंडू मिळवणे आणि पुढे जाऊन गोलच्या संधी निर्माण करणे इंग्लंड संघाला अवघड गेले. इंग्लंडला गोलची सर्वोत्तम संधी १६व्या मिनिटाला मिळाली होती, पण त्यावेळी आघाडीपटू लॉरेन हेम्पने मारलेला फटका क्रॉसबारला लागला.

दुसरीकडे, स्पेनच्या आक्रमणाला चांगली धार होती. उपांत्य सामन्यात नेदरलँड्सविरुद्ध गोल करणाऱ्या कार्मोनाने अंतिम लढतीतही निर्णायक भूमिका बजावली. उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात गोल करणाऱ्या सलमा पारालुएलोलाही गोलची संधी होती. मात्र, उत्तरार्धानंतर तिने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. ६८व्या मिनिटाला गोलकक्षामध्ये इंग्लंडच्या केरा वॉल्शच्या हाताला चेंडू लागल्याने स्पेनला पेनल्टी देण्यात आली. मात्र, स्पेनच्या जेनिफर हार्मोसोने मारलेला फटका इंग्लंडची गोलरक्षक मेरी इअरप्सने अडवला. त्यामुळे स्पेनची आघाडी वाढली नाही. परंतु इंग्लंडला स्पेनचा भक्कम बचाव भेदण्यात अपयश येत होते. अखेर स्पेनने एका गोलची आघाडी अखेपर्यंत राखत सामना जिंकला.

महिला विश्वचषक जिंकणारा स्पेन हा पाचवा संघ ठरला आहे. यापूर्वी अमेरिका (चार वेळा), जर्मनी (दोन वेळा), नॉर्वे (एकदा) आणि जपान (एकदा) या देशांचे संघ विश्वविजेते ठरले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

इंग्लंड संघ अपयशी

अंतिम लढतीत इंग्लंडचे पारडे जड मानले जात होते. इंग्लंडने गेल्या वर्षी युरोपीय अजिंक्यपद स्पर्धा जिंकली होती. तसेच अंतिम लढतीसाठी प्रमुख मध्यरक्षक लॉरेन जेम्सही उपलब्ध होती. मात्र, यानंतरही इंग्लंडला सर्वोत्तम खेळ करण्यात अपयश आले. त्यामुळे इंग्लंड महिला संघाचे पहिल्यांदा महिला विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.