PAK vs SA 2nd Test Asif Afridi 38 years old Debutant: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळवली जात आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने कसोटी वर्ल्ड चॅम्पियन दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला. आता दुसरा कसोटी सामना सुरू असून यामध्ये पाकिस्तानच्या ३८वर्षीय खेळाडूला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच सामन्यात ५ विकेट्स घेत दणका उडवला.
पाकिस्तानकडून कसोटी पदार्पण करणारा दुसरा सर्वात वयस्कर क्रिकेटपटू आसिफ आफ्रिदीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्याच डावात उत्कृष्ट कामगिरी केली. ३८ वर्षीय डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने बुधवारी (२२ ऑक्टोबर) पाच विकेट्स घेत पाहुण्या संघाच्या फलंदाजीला सुरूंग लावला. आसिफच्या शानदार गोलंदाजीमुळे पाकिस्तानच्या पहिल्या डावातील ३३३ धावांच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने २३५ षटकांत आठ विकेट्स गमावल्या.
आसिफ आफ्रिदीने ५५ धावा करणाऱ्या टोनी डी जॉर्जीचा पहिला बळी घेतला. त्यानंतर त्याने डेवाल्ड ब्रेव्हिसला बाद केलं, जो खातंही उघडू शकला नाही. त्यानंतर त्याने काइल व्हेरेनला १० धावांवर बाद केलं. त्याचा चौथा बळी ट्रिस्टन स्टब्स ठरला, जो ७६ धावा करत संघाचा डाव सावरत होता. आसिफ आफ्रिदीने सायमन हार्मरला २ धावांवर बाद करत पाचवा बळी घेतला.
दक्षिण आफ्रिकेने ५४ धावांत दोन विकेट्स गमावल्या. त्यानंतर ट्रिस्टन स्टब्स आणि टोनी डी जोर्झी यांनी ११३ धावा जोडल्या. आसिफने डी जोर्झीला बाद केलं आणि पाकिस्तानने सामन्यात पुनरागमन केलं. दक्षिण आफ्रिकेने ६८ धावांवर सहा विकेट्स गमावल्या. त्यांचा तिसरी विकेट १६७ धावांवर पडली. त्यानंतर त्यांची अवस्था ८ बाद २३५ अशी झाली.
दक्षिण आफ्रिकेकडून ट्रिस्टन स्टब्सने ७६ आणि टोनी डी जॉर्झीने ५५ धावा केल्या, तर कर्णधार एडेन मारक्रमने ३२, रायन रिकेल्टनने १४, काइल व्हेरेनने १० आणि सायमन हार्मरने २ धावा करत बाद झाले. सेनुरन मुथुस्वामी ४५ धावा आणि केशव महाराज १० धावा करत खेळत होते. पाकिस्तानकडून आसिफ आफ्रिदीने पाच, तर शाहीन आफ्रिदी, नोमान अली आणि साजिद खान यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
आसिफ आफ्रिदी कसोटी क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू
आसिफ आफ्रिदी कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेणारा जगातील सर्वात वयस्कर क्रिकेटपटू ठरला आहे. ३८ वर्षे आणि ३०१ दिवस वय असलेल्या आफ्रिदीने रावळपिंडीमध्ये कसोटी पदार्पण केलं आणि त्याने त्याच्या पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. आसिफ आफ्रिदीने इंग्लंडचा फिरकी गोलंदाज चार्ल्स मॅरियटचा १९३३ मध्ये केलेला विक्रमही मोडला. मॅरियटने ३७ वर्षे ३३२ दिवस वय असताना त्याच्या कसोटी पदार्पणात पाच विकेट्स घेतल्या होत्या.
तिसऱ्या दिवसाच्या लंचब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेने ८ बाद २८५ धावा केल्या आहेत. यासह आफ्रिकेचा संघ ४८ धावांनी पिछाडीवर आहे. पाकिस्तानने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३३३ धावा केल्या. केशव महाराजने ७ विकेट्स घेत पाकिस्तानचा डाव आटोपला.