Pakistan captain Salman Ali Agha donates match fee to Operation Sindoor victims Asia Cup 2025 final : भारत पाकिस्तान यांच्यात रविवारी झालेल्या आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या सामन्याला काही राजकीय पक्षांकडून विरोध झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान भारतीय संधाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने तो या स्पर्धेतील आपली संपूर्ण मॅच फी भारतीय सशस्त्र दलांना आणि २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यातील पीडितांना देणार असल्याचे जाहीर केले आहे.
यानंतर पाकिस्तानी संघाचा कर्णधार सलमान अली आगा याने देखील एक घोषणा केली आहे. पाकिस्तानी संघ भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान प्रभावित झालेल्या ‘नागरिक आणि मुलांसाठी’ दान करेल, असे आगाने जाहीर केले आहे.
“एक संघ म्हणून, आम्ही आमची मॅच फीस भारताच्या हल्ल्यात प्रभावित झालेल्या नागरिक आणि मुलांना दान करण्याचा निर्णय घेतला आहे,” असे आगा याने सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे एप्रिलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारताने प्रत्तुत्तर देत ऑपरेशन सिंदूर राबवले होते. या मोहिमेदरम्यान पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील अनेक दहशतवादी तळांवर भारतीय लष्कराने कारवाई केली होती.
सूर्यकुमारची पहलगाम हल्ला पीडित आणि सैन्याला मदत
अंतिम सामन्यातील विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने ‘एक्स’वर एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने म्हटले की, “मी या स्पर्धेतील माझी संपूर्ण मॅच फी आपल्या सशस्त्र दलांना आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. जय हिंद.”
भारतीय संघाने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. यावरून पाकिस्तानच्या कर्णधाराने भारतीय संघावर टीका केली. आगने भारताची ही कृती निराशाजनक असल्याचे म्हटले, पुढे ते म्हणाला की, “हस्तांदोलन न करून ते आमचा नाही, तर क्रिकेटचा अपमान करत आहेत. चांगले संघ असे वागत नाहीत.”
दरम्यान आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचे १४७ धावांचे लक्ष्य पाच विकेट्स आणि दोन चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. यामध्ये तिलक वर्माने ५३ चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ६९ धावांची खेळी केली.