Pakistan Gold Winner Arshad Nadeem: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राला रौप्यपदक तर पाकिस्तानच्या अर्शद नदीमला सुवर्णपदक मिळाले. नीरज चोप्रा यावेळीही सुवर्णपदकावर नाव कोरेल, अशी सर्वांची अपेक्षा होती. मात्र अर्शद नदीमने ९० मीटरच्या पुढे भालाभेक करून सुवर्णपदकावर नाव कोरले. पाकिस्तानसाठी अर्शदने पहिले वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे. अर्शदसाठी सुवर्णपदकाचा हा प्रवास सोपा नव्हता. खडतर आयुष्यातून पुढे आलेल्या अर्शदला पॅरिसला पाठवायचे की नाही? इथपासून त्यांच्या ऑलिम्पिक प्रवासाची सुरुवात झाली.

ऑलिम्पिक सुरू होण्याआधी पाकिस्तान राष्ट्रीय क्रीडा मंडळाने सात खेळाडूंपैकी कुणाला पॅरिसला पाठवायचे यावर बराच खल केला. शेवटी अर्शद नदीम आणि त्याचे प्रशिक्षक सलमान फयाज बट यांना पॅरिसला पाठविण्यासाठी पुरेसा निधी जमवला गेला. पाकिस्तानच्या क्रीडा मंडळाने (PSB) त्यांना विमानाचे तिकीट काढून दिले. गुरुवारी (८ ऑगस्ट) पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील खानेवल गावातील २७ वर्षीय या युवकाने ऑलिम्पिकमध्ये पाकिस्तानच्या क्रीडा मंडळाचा विश्वास सार्थ करून दाखवत देशासाठी सुवर्ण पदक जिंकले.

हे वाचा >> Neeraj Chopra Mother: सुवर्णपदक हुकल्यानंतर नीरज चोप्राच्या आईचं पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दल मोठं विधान; म्हणाल्या…

एकेकाळी अन्नही घेणं होतं कठीण

अर्शद नदीमचे कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आले. एकेकाळी नदीमच्या कुटुंबीयांना आवडीचे अन्न घेणंही परवडत नव्हतं. अर्शदचे वडील बांधकाम मजूर असून त्यांना सात मुलं होती. घरात वडीलच कमावते असल्यामुळे अर्शदच्या कुटुंबाला मांस खायचं असेल तर ईदची वाट पाहावी लागत असे, अशी आठवण अर्शदचा मोठा भाऊ शाहीद अझीमने अल जझीरा वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

शुक्रवारी पहाटे पाकिस्तानच्या ६.३ फुटांची उंची असलेल्या या खेळाडूने आपल्या आयुष्यातील सर्व संघर्ष पणाला लावत भाला फेकला आणि ९२.९७ मीटरचा थ्रो करत यंदाच्या ऑलिम्पिकमधील सर्वोच्च विक्रम नोंदविला. याआधी ऑलिम्पिकमध्ये ९०.५७ मीटरचा विक्रम होता, तो अर्शदने मोडीत काढला.

हे ही वाचा >> “देशात तयार होणाऱ्या नव्या खेळाडूंसाठी…”, पंतप्रधान मोदींची नीरज चौप्राच्या पाठीवर कौतुकाची थाप

ज्यावेळी अर्शदने अंतिम फेरी गाठली होती, तेव्हा अर्शदचे वडील मोहम्मद अश्रफ यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले, “अर्शदला ही संधी कशी मिळाली, याबद्दल लोकांना फारशी माहिती नसेल. अर्शदने इतर शहरात जाऊन प्रशिक्षण घ्यावे म्हणून गावातील लोकांनी आणि नातेवाईकांनी वर्गणी काढून त्याला पैसे दिले आहेत.” अर्शद नदीम सलग दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये अंतिम फेरीसाठी पात्र ठरला. त्यानंतर त्याच्या गावात गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अर्शदने मागच्या वर्षी जागतिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. तर २०२२ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत ९०.१८ मीटरचा थ्रो करत सुवर्णपदक जिंकले होते. मंगळवारी त्याने ८६.५९ मीटरचा थ्रो टाकून अंतिम फेरीत आपली जागा निश्चित केली होती. तर नीरज चोप्राने ८९.३४ मीटरचा थ्रो करत अंतिम फेरी गाठली होती.