पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने आशिया कप २०२२ मध्ये भारताविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. आपल्या गोलंदाजीशिवाय या युवा वेगवान गोलंदाजाने आपल्या इच्छाशक्तीने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली. खरंतर, नसीम खान जेव्हा षटक टाकत होता, तेव्हा त्याच्या पायाला क्रॅम्प येत असल्याने त्याला त्रास होत होता, पण तरीही त्याने गोलंदाजी केली. सध्या त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की भारताविरुद्धचा सामना संपल्यानंतर नसीम रडत मैदानातून बाहेर येत आहे. त्याला खेळत असताना क्रॅम्पमुळे खूप त्रास करावा लागला. मैदानातून बाहेर आल्यावर त्याला जेव्हा पाणी देण्यात आले तेव्हा त्याने पाणी घेण्यासही नकार दिला. हा व्हिडीओ डीबीटीव्ही स्पोर्ट्सच्या ऑफिशिअल इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. मैदानातून बाहेर येताना त्याने आपला चेहरा हाताने झाकलेला होता. असे वाटते की तो आपले अश्रू पुसत होता.
…अन् हार्दिक पंड्याने मोहम्मद रिझवानचा गळाच पकडला; मैदानावरील फोटो होतोय व्हायरल
नसीम शाहने पहिल्याच षटकात केएल राहुलला शून्यावर बोल्ड केले. यानंतर त्याने सूर्यकुमार यादवलाही बाद केले. त्याचबरोबर या सामन्यात नसीम शाहने ४ षटकात २७ धावा देत २ खेळाडू बाद केले. नसीमने स्वबळावर पाकिस्तानमध्ये विजयाची आशा जागवली होती. पाकिस्तानचा संघ १४७ धावांवर ऑलआऊट झाला. टीम इंडिया हे लक्ष्य सहज गाठेल असं वाटत होतं, पण शेवटच्या षटकापर्यंत सामना खेचला गेला.
नसीम शाह जेव्हा शेवटचे षटक टाकत होता तेव्हा त्याला क्रॅम्प आला, पण तरीही त्याने ते ओव्हर टाकले. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांच्यातील उत्कृष्ट भागीदारीमुळे भारताने हा सामना ५ विकेटने जिंकला.