थंड हवेच्या पांचगणीत राज्यातील मातब्बर कबड्डी संघ डेरेदाखल झाले आहेत. महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्रा, मुंबई बंदर, आरसीएफ, मुंबई पोलीस, मुंबई महानगरपालिका, ठाणे पोलीस, महाराष्ट्र विद्युत मंडळ, युनियन बँक, देना बँक, पी.डी. हिंदुजा, कोल्हापूर पोलीस, रायगड पोलीस असे १२ संघ पांचगणी व्यायाम मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत सहभागी होत आहेत.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन आणि सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पध्रेसाठी पांचगणी व्यायाम मंडळाच्या पटांगणात चार क्रीडांगणे तयार करण्यात आली आहेत. याचप्रमाणे तीन हजार प्रेक्षकक्षमतेची गॅलरीही बांधण्यात आली आहे.
१२ संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली असून, साखळी आणि बाद पद्धतीने हे सामने रंगणार आहेत. सायंकाळी थंडीचे आव्हान असल्यामुळे पांचगणीत प्रामुख्याने उजेडातच सामने होतात, अशी माहिती संयोजक फिरोझ पठाण यांनी दिली. स्पध्रेतील विजेत्या संघाला २१ हजार रुपये रोख आणि चषक, तर उपविजेत्या संघाला १० हजार रुपये रोख आणि चषक प्रदान करण्यात येईल. तसेच उपांत्य पराभूत संघ, सर्वोत्तम चढाईपटू, सर्वोत्तम पकडपटू, मालिकावीर आणि दिवसाचा मानकरी अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत. यासोबतच विविध वयोगटांसाठी जिल्हास्तरीय कबड्डी स्पध्रेचे आयोजनही करण्यात आले आहे.