भारताच्या पंकज अडवाणीने इजिप्तमध्ये झालेल्या जागतिक स्नूकर (रेड) स्पर्धेत विजेतेपद मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने बिलियर्ड्सच्या शॉर्ट स्वरूपात (सहा चेंडू) यापूर्वीच अजिंक्यपद मिळविले होते.
पंकजने अंतिम लढतीत पोलंडच्या कीपर फिलिपिक याच्यावर ६-१ अशा फ्रेम्सने मात केली. त्याचे स्नूकरच्या रेड स्वरूपाच्या स्पर्धेत हे पहिलेच विश्वविजेतेपद आहे. त्याने यापूर्वी बिलियर्ड्समध्ये सात वेळा तर स्नूकरमध्ये एकदा विश्वविजेतेपद मिळविले आहे. त्याने  बिलियर्ड्स व स्नूकरच्या विश्व स्पर्धेत पदार्पणातच अजिंक्यपद मिळविले होते.
इजिप्तमधील विजेतेपदानंतर पंकज याने सांगितले, या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्याची मला अपेक्षा नव्हती. मात्र गेल्या दोन महिन्यांत मी बिलियर्ड्स व स्नूकरचा भरपूर सराव केला होता. त्याचाच फायदा मला येथे झाला. या विजेतेपदाचे श्रेय नोकरीत मला भरपूर सुविधा देणाऱ्या ओएनजीसी कंपनीस द्यावे लागेल.