पंकज अडवाणी या भारतीय खेळाडूने जागतिक रेड स्नूकर स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीकडे आगेकूच केली. त्याने माल्टा देशाचा खेळाडू अ‍ॅलेक्स बोर्ग याच्यावर ४-० अशी मात केली. भारताच्या कमल चावला याचे आव्हान मात्र संपुष्टात आले. कतारच्या मोहसीन बुक्षैशा याने त्याचा ४-२ अशा फ्रेम्सने हरविले. सांघिक विभागात पंकज याने ब्रिजेश दमाणी याच्या साथीत पोलंडच्या केस्पर फिलिपॅक व मातेयुझ बारानोवस्की यांच्यावर ३-२ अशा फ्रेम्सने मात केली. मात्र त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत त्यांना पाकिस्तानच्या महंमद असिफ व साजिद हुसेन यांनी ४-१ असे हरविले. भारताच्या सौरव कोठारी व शिवम अरोरा यांनाही उपांत्यपूर्व लढतीत हुसेन वेफेई व इशान हैदर अली यांच्याकडून ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला.
 महिलांच्या दुहेरीत भारताच्या विद्या पिल्ले व अमी कामानी यांनी जेसिका वुड्स व कॅथी पाराशिस यांना ४-० असे हरविले. या दोन्ही खेळाडूंनी एकेरीतही आपले आव्हान राखले.