कारकिर्दीत प्रथमच पंकज अडवानी याने लीड्स येथे होणाऱ्या जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेत सहभागी न होता आंतरराष्ट्रीय स्नूकर स्पर्धामध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. पंकज याने गतवर्षी जागतिक बिलियर्ड्स स्पर्धेत इंग्लंडच्या माईक रसेल याच्यावर मात करीत अजिंक्यपद मिळविले होते. हे विजेतेपद राखण्याऐवजी तो चीनमध्ये २७ ऑक्टोबरपासून होणाऱ्या स्नूकर स्पर्धेत भाग घेणार आहे. चीनमधील स्पर्धेसाठी त्याने दुसऱ्यांदा पात्रता निकष पूर्ण केले आहेत.
‘‘गतवर्षी मी बिलियर्ड्सच्या जगज्जेतेपदासाठी लक्ष केंद्रित केले होते. यंदा स्नूकरवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहे. त्यामुळेच नाइलाजास्तव मला बिलियर्ड्सच्या जागतिक स्पर्धेवर पाणी सोडावे लागणार आहे,’’ असे पंकजने सांगितले.