युवा अष्टपैलू खेळाडू परवेझ रसूलचे नाव आता क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळविणारा तो जम्मू आणि काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. आगामी झिम्बाब्वे दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करताना राष्ट्रीय निवड समिती कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि अन्य चार महत्त्वाच्या गोलंदाजांना विश्रांती दिली आहे.
हरारे आणि बुलावायो येथे २४ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी १५ सदस्यीय भारतीय संघाची शुक्रवारी निवड करण्यात आली. २४ वर्षीय रसूलने आपल्या कामगिरीद्वारे लक्ष वेधून झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान मिळवले.
तंत्रशुद्ध फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. याचप्रमाणे सध्या धोनीच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडिजमधील तिरंगी क्रिकेट स्पध्रेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीकडेच या मालिकेसाठी कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
सौराष्ट्रचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटनेही पुन्हा भारतीय संघात स्थान निर्माण केले आहे. याचप्रमाणे आयपीएलच्या सहाव्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जकडून लक्षवेधी कामगिरी बजावणारा हरयाणाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माला एकदिवसीय पदार्पणाची संधी चालून आली आहे.
कप्तान आणि यष्टीरक्षक धोनीसह वेगवान गोलंदाज इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि ऑफ-स्पिनर आर. अश्विन यांना विश्रांती देण्यात आली. तथापि, सलामीवीर मुरली विजयला संघातून वगळण्यात आले आहे. राष्ट्रीय निवड समितीने भारतीय संघाची निवड करताना अनुभवी गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग, झहीर खान, प्रवीण कुमार आणि युवराज सिंग यांचा विचार करण्यात आला नाही.
‘‘झिम्बाब्वे दौऱ्यासाठी आम्ही युवा खेळाडूंना प्राधान्याने संधी दिली आहे,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
भारतीय संघात सात विशेषज्ञ फलंदाज, तीन फिरकी गोलंदाज, चार वेगवान गोलंदाज आणि एक यष्टीरक्षक दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा भारताच्या सलामीची धुरा सांभाळतील, तर कोहली, पुजारा, सुरेश रैना, अंबाती रायुडू व अजिंक्य रहाणे मधल्या फळीत फलंदाजी करतील.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अश्विनला विश्रांती दिल्यामुळे ऑफ-स्पिनर रसूल याला संधी मिळाली आहे. मागील हंगामापासून महान फिरकी गोलंदाज बिशनसिंग बेदी यांचे जम्मू आणि काश्मीर संघाला मार्गदर्शन लाभत आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रसूलची कारकीर्द घडत आहे.
इंग्लंड व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी रसूलने भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यापैकी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने ४५ धावांत ७ बळी घेत सर्वाचे लक्ष वेधले होते. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात त्याला पुणे वॉरियर्सने करारबद्ध केले होते. आयपीएल खेळणारा तो जम्मू आणि काश्मीरचा पहिला क्रिकेटपटू ठरला होता.
‘‘स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी मी कठोर मेहनत घेतली होती. त्या मेहनतीचे फळ मिळाले. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी निवड समिती रविचंद्रन अश्विनला विश्रांती देईल, अशी अपेक्षा होती. आता भारतीय संघात समावेश झाल्याने मी खूप आनंदी आहे. देवाच्या कृपेमुळेच हे शक्य होऊ शकले.’’
परवेझ रसूल, भारताचा फिरकीपटू

झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, चेतेश्वर पुजारा, सुरेश रैना, अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, परवेझ रसूल, मोहम्मद शामी, विनय कुमार, जयदेव उनाडकट, मोहित शर्मा.
द. आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय ‘अ’ संघ
चेतेश्वर पुजारा (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, रोहित शर्मा, सुरेश रैना, अंबाती रायुडू, दिनेश कार्तिक, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, परवेझ रसूल, शाहबाझ नदीम, मोहम्मद शामी, स्टुअर्ट बिन्नी, ईश्वर चंद पांडे, जयदेव उनाडकट, सिद्धार्थ कौल.