Asia Cup 2025 India vs Pakistan Handshake Controversy: भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा वाद आता चिघळला आहे. हस्तांदोलन न करण्याच्या मुद्यावरून सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांची हकालपट्टी करावी अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष तसंच आशियाई क्रिकेट काऊंसिलचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी केली आहे. आशिया चषकाच्या उर्वरित सामन्यांमधून पायक्रॉफ्ट यांची तातडीने हकालपट्टी करण्यात यावी असं नक्वी यांचं म्हणणं आहे. पायक्रॉफ्ट यांनीच दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याची सूचना दिली होती असा आरोप नक्वी यांनी केला. सर्वसाधारण शिरस्त्यानुसार टॉसच्या वेळी दोन्ही कर्णधार हस्तांदोलन करतात. आपापल्या संघांची यादी एकमेकांना तसंच सामनाधिकाऱ्यांना देतात. रविवारी झालेल्या लढतीवेळी भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा यांनी हस्तांदोलन केलं नाही.

मागण्या पूर्ण न झाल्यास पाकिस्तानने स्पर्धेतून माघार घेण्याची धमकी दिली आहे. हस्तांदोलनाच्या मुद्यावरून पाकिस्तानने सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांना हटवण्याची मागणी केली. मागणी पूर्ण न झाल्यास स्पर्धेतून माघार घेऊ असा इशारा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने दिला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी हेच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत.

सोमवारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हे प्रकरण पुढे रेटलं आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात आयसीसीकडे तक्रार दाखल केली आहे. सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांच्याकडून आयसीसी कोड ऑफ कंडक्ट आणि एमसीसीच्या स्पिरीट ऑफ द गेम यांचे उल्लंघन झाल्याचा आरोप पीसीबीने केला आहे. यासंदर्भात पायक्रॉफ्ट यांना उर्वरित सामन्यातून बाजूला करण्यात यावं अशी मागणी नक्वी यांनी एक्स वर केलेल्या पोस्टमध्ये केली आहे.

क्रिकइन्फो संकेतस्थळाने हे वृत्त दिलं आहे. क्रिकइन्फोने यासंदर्भात सामनाधिकारी अँडी पायक्रॉफ्ट यांनी दोन्ही कर्णधारांना हस्तांदोलन न करण्याची सूचना खरंच दिली होती का यासंदर्भात विचारलं आहे.

भारताने सामना जिंकल्यानंतर भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे लगेचच ड्रेसिंगरुममध्ये परतले. या दोघांनी पाकिस्तानचे खेळाडू तसंच पंचांशी हस्तांदोलन केलं नाही. भारतीय संघातील अन्य खेळाडू, सपोर्ट स्टाफ यांनीही पाकिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही.

सामना संपल्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाला पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली अघा उपस्थित राहिला नाही. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला सलमानऐवजी पाकिस्तानचे प्रशिक्षक माईक हेसन उपस्थित होते. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने हा विजय भारतीय लष्कराला समर्पित केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जीव गमावलेल्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असंही त्याने सांगितलं. पाकिस्तानविरुद्ध खेळण्यासंदर्भात केंद्र सरकार आणि बीसीसीआय यांच्यात समन्वय आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या धोरणानुसार हा सामना झाला. आयसीसीतर्फे आयोजित स्पर्धा तसंच आशिया चषक या स्पर्धांमध्ये भारत-पाकिस्तान सामना होईल. मात्र दोन्ही देशांदरम्यान द्विराष्ट्रीय मालिका होणार नाही.

यासंदर्भात बीसीसीआयचे सचिव देवजीत साईकिया तसंच बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनीही भूमिका मांडली होती. भारताने पाकिस्तानच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्यास ऑलिम्पिक तसंच कॉमनवेल्थच्या आयोजनावर परिणाम होऊ शकतो याकडे त्यांनी लक्ष वेधलं होतं.

आशिया चषकाचं आयोजन आशियाई क्रिकेट परिषदेतर्फे होतं. यामध्ये आयसीसीचा थेट संबंध नाही. मात्र सामन्यांसाठी पंच आणि सामनाधिकारी यांची नियुक्ती आयसीसीकडून होते. यंदाच्या आशिया चषकाचे यजमान भारतीय संघ आहे. मात्र सध्या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षपद पाकिस्तानकडे आहे.