ICC Womens World Cup 2025: आयसीसी महिला वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेला येत्या ३० सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. या स्पर्धेत एकूण ८ संघ जेतेपदासाठी झुंज देताना दिसून येणार आहेत. बऱ्याच वर्षांनी भारताला महिलांच्या वर्ल्डकप स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. त्यामुळे यावेळी आयोजन जोरदार होणार, यात काहीच शंका नाही. दरम्यान स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. या सोहळ्यापूर्वी एक मोठी अपडेट समोर येत आहे.
या स्पर्धेची सुरूवात भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्याने होणार आहे. या सामन्याआधी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यासाठी पाकिस्तान संघातील कुठलाही खेळाडू भारतात येणार नसल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानच्या महिला संघाचे कर्णधारपद सना फातिमाकडे आहे. महिला वर्ल्डकप स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन गुवाहाटीतील बारसापरा स्टेडियममध्ये करण्यात आले आहे. या सोहळ्याचा रोमांच आणखी वाढवण्यासाठी प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालला आमंत्रण देण्यात आलं आहे.आयसीसीच्या स्पर्धेतील उद्घाटन सोहळ्याला संघाचा कर्णधार उपस्थित असणं गरजेचं असतं. एएनआयच्या वृत्तानुसार, जिओ सुपरच्या हवाल्याने अशी माहिती देण्यात आली आहे की, पाकिस्तानची कर्णधार सना फातिमा किंवा पाकिस्तान संघातील कुठलाही सदस्य उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार नाही.
याआधी झालेल्या पुरुषांच्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उद्घाटनावेळी देखील भारताचा कर्णधार रोहित शर्माने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. याच कारणास्तव पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे. या स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. पण, भारतीय संघाचे सर्व सामने यूएईत खेळवले गेले होते.
भारतीय संघ आपले सर्व सामने भारतात खेळणार आहे. पण पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्याचे आयोजन श्रीलंकेत करण्यात आले आहे. या स्पर्धेतील अंतिम सामना २ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. जर पाकिस्तानने या स्पर्धेतील उपांत्य फेरीत आणि अंतिम फेरीत प्रवेश केला, तर या सामन्याचे आयोजन श्रीलंकेतील प्रेमदासा स्टेडियममध्ये केले जाईल. या स्पर्धेतील उपांत्यफेरीचा सामना २९ ऑक्टोबरला आणि स्पर्धेतील अंतिम सामना २ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.