उसळणारा चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कसोटी फलंदाज फिल ह्युजेसला तातडीने सेंट व्हिन्सेंट इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सिडनी स्पोर्ट्स ग्राऊंडवरील साऊथ ऑस्ट्रेलिया आणि न्यू साऊथ वेल्स यांच्यातील शेफिल्ड शिल्ड सामन्यादरम्यान ह्युजेस जायबंदी झाला.
सीन अॅबोटचा उसळणारा चेंडू २५ वर्षीय फिलच्या डोक्यावर आदळला आणि तो क्षणार्धात मैदानावर कोसळला. मग स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. फिलवर शस्त्रक्रिया झाली असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
ह्युजेसला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेताना कृत्रिम श्वासोच्छ्वास पुरवण्यात आला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर त्याच्यासोबत होता. त्यानंतर किमान तीन रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टर त्याच्या उपचारासाठी आणि इस्पितळात नेण्यासाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. सेंट व्हिन्सेंट इस्पितळात ह्युजेस दाखल होताच ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क तातडीने तिथे पोहोचला. ह्युजेसची बहीण आणि आई व्हर्जिनिया यांनीसुद्धा ईस्पितळात पाचारण केले आहे.
साऊथ ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशनने (एसएसीए) काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ‘‘या कठीण काळात ‘एसएसीए’ मंडळ आणि पदाधिकारी फिल ह्युजेस आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आहोत. फिलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, तो सिडनीमधील इस्पितळात उपचार घेत आहे. त्याच्यासोबत कुटुंबीय आणि ‘एसएसीए’चे महाव्यवस्थापक टिम नेल्सन आहेत.’’
‘‘या घटनेने मला अतिशय धक्का बसला आहे. ह्युजेसची शस्त्रक्रियेनंतरची स्थिती २४ ते ४८ तासांत स्पष्ट होऊ शकेल,’’ असे ‘एसएसीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी किथ ब्रॅडशॉ यांनी सांगितले.
‘‘मैदानावर सुदैवाने फिलला त्वरित वैद्यकीय मदत पुरवण्यात आली. त्याची प्रकृती चिंताजनक आहे, हे सर्वानाच ठाऊक आहे,’’ असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेम्स सदरलँड यांनी पत्रकारांना सांगितले.
भारताविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करण्यासाठी ह्युजेस उत्सुक होता. जायबंदी होण्यापूर्वी त्याच्या खात्यावर ६३ धावा जमा होत्या. २००९मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने पदार्पण केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2014 रोजी प्रकाशित
उसळणारा चेंडू डोक्यावर आदळल्याने फिल ह्य़ुजेसची प्रकृती चिंताजनक
उसळणारा चेंडू डोक्यावर आदळल्यामुळे ऑस्ट्रेलियाचा कसोटी फलंदाज फिल ह्युजेसला तातडीने सेंट व्हिन्सेंट इस्पितळात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
First published on: 26-11-2014 at 04:57 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phil hughes in critical condition after being hit by bouncer