बॉलिवूड निर्माता करण जोहर याच्या ‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यांप्रकरणी अष्टपैलू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बीसीसीआयने कारवाई केली आहे. चौकशीचा निकाल येईपर्यंत दोन्ही खेळाडू बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत खेळू शकणार नाहीयेत. अनेक माजी खेळाडूंनी या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं असून, बहुतांश खेळाडूंनी दोन्ही खेळाडूंवर केलेल्या कारवाईबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या यादीत आता भारताचा Gentleman क्रिकेटपटू राहुल द्रविडचाही समावेश झाला आहे. लोकांनी राईचा पर्वत करणं थांबवावं असं मत राहुल द्रविडने व्यक्त केलं आहे.

“खेळाडूंनी याआधी कधीच चुका केल्या नाहीयेत अशातला भाग नाही. खेळाडूंना मार्गदर्शन केल्यानंतरही भविष्यात अशा चुका होणार नाहीत असंही सांगता येणार नाही. त्यामुळे या प्रकरणी आपण राईचा पर्वत करणं थांबवलं पाहिजे.” द हिंदू वृत्तपत्राशी बोलत असताना द्रविडने आपलं मत मांडलं. दोन्ही खेळाडूंवर बंदीची कारवाई केल्यानंतर बीसीसीआयने आता खेळाडूंना वर्तणुकीविषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन केले आहे. भारताचा वरिष्ठ संघ, अ संघ तसेच १९ वर्षांखालील संघातील खेळाडूंसाठी हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – विराट कोहली ठरला ‘हॅटट्रीक हिरो’, पटकावले ICC चे मानाचे पुरस्कार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘‘भारतीय खेळाडूंना बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत वर्तणुकीविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. राहुल द्रविड, अनिल कुंबळेसारखे माजी खेळाडू संघातील खेळाडूंना मार्गदर्शन करतील. त्याचबरोबर लैंगिक समानतेविषयीही सत्राचे आयोजन करण्यात येईल,’’ असे ‘बीसीसीआय’च्या अधिकाऱ्याने सांगितले. राहुल द्रविडनेही यावेळी खेळाडूंना वर्तणुकीविषयी मार्गदर्शन करता येण्याबद्दल सकारात्मकता दर्शवली आहे, मात्र प्रत्यक्ष मैदानात गेल्यानंतर खेळाडू कसे वागतात यावरही अनेक गोष्टी अवलंबूत असल्याचं द्रविडने म्हटलं. त्यामुळे या प्रकरणी आता पुढे नेमक्या काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – पृथ्वी शॉचे पुनरागमनाचे संकेत, म्हणाला आयपीएलआधी फिट होईन !