विराट कोहलीच्या अनुपस्थितीत सध्या भारतीय संघाची धुरा अनुभवी अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर आहे. रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात दोन खेळाडूंनी पदार्पण केलं होतं. तर तिसऱ्या कसोटीत नवदीप सैनीनं कसोटी पदार्पण केलं आहे. कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये रहाणेनं मोजक्याच सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. मात्र,अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात आतापर्यंत तब्बल १० खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. ही नावं वाचून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल…

२०१५ मध्ये भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला होता. या संघाची धुरा रहाणेच्या खांद्यावर होती. रहाणेच्या नेतृत्वात पदार्पण करणारा मनीष पांडे पहिला खेळाडू होता. पांडेने त्या दौऱ्यावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर, त्याच दौऱ्यावर टी-२० मध्ये केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, मनिष पांडे, अक्षर पटेल, संदीप शर्मा आणि संजू सॅमसन अशा तब्बल सहा खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

आणखी वाचा- ‘रोहित-वॉर्नर यांची कामगिरी मालिकेचे भवितव्य ठरवेल’

२०१७ मध्ये विराट कोहलीच्या अनुपस्थितीत कसोटी क्रिकेटमध्ये रहाणेकडे नेतृत्व देण्यात आलं. धर्मशाला कसोटी सामन्यात कुलदीप यादवनं भारतीय संघाकडून पदार्पण केलं होतं. त्यानंतर आता विराट कोहली मायदेशी परतल्यामुळे रहाणेकडे नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात मोहम्मद सिराज आणि शुबमन गिल यांनी पदार्पण केलं होतं. तर तिसऱ्या कसोटीत नवदीप सैनीनं पदार्पण केलं आहे.

आणखी वाचा- रहाणेची ‘कसोटी’ सुरुच; मात्र शास्त्री गुरुजी म्हणतात, “विराटसारखी कामगिरी…”

विशेष म्हणजे, रहाणेच्या नेतृत्वात आतापर्यंत भारतीय संघाला एकदाही पराभव पाहावा लागला नाही. २०१७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधा, २०१८ मध्ये आफगाणिस्तानविरोधात आणि २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरोधात अजिंक्य रहाणेनं भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. त्यामुळे, कसोटीमध्ये कर्णधार म्हणून रहाणेचा १०० टक्के ट्रॅक रेकॉर्ड अद्याप कायम आहे.