युनियन बँक आणि महाराष्ट्र राज्य पोलीस या संघांनी पांचगणी व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या पुरुषांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेची उपांत्य फेरी गाठली आहे. महिलांमध्ये मुंबईच्या शिवशक्ती संघाने ठाण्याच्या होतकरू संघावर आरामात विजय मिळवला. पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात महाराष्ट्र राज्य पोलिसांनी मध्यंतराला १४-६ अशी आघाडी घेतली होती. यात संकेत धुमाळ आणि अनिल पाटीलच्या दिमाखदार चढाया याचप्रमाणे देवेंद्र कदम आणि महेश मोकल यांच्या प्रेक्षणीय चढायांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राज्य पोलिसांनी १७-१४ अशा फरकाने हा सामना खिशात घातला.
दुसऱ्या उपांत्यपूर्व लढतीत युनियन बँकेने बँक ऑफ इंडियाला २६-१२ अशी धूळ चारली. रोहित शेठ युनियन बँकेच्या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने एका चढाईत तीन गडी बाद करण्याचाही पराक्रम केला. त्याला तोलामोलाची साथ लाभली ती विजय दिवेकरची.विशाल कदमने शानदार पकडी केल्या. महिलांच्या साखळी सामन्यात शिवशक्तीने होतकरू संघाविरुद्ध पहिल्या सत्रात ५-३ अशी आघाडी घेतली होती; परंतु दुसऱ्या सत्रात सोनाली शिंगटे आणि तेजश्री चौगुले यांनी चढायांचे गुण घेण्याचा सपाटा लावून शिवशक्तीला ३५-५ असा विजय मिळवून दिला.