कमकुवत संघाकडून खेळण्याचे आव्हान पेलवत आसाम संघात सकारात्मक बदल करुन घेतले, हीच माझ्यासाठी मोठी कामगिरी आहे, असे आसामच्या रणजी संघाकडून खेळणारा महाराष्ट्राचा क्रिकेटपटू धीरज जाधवने सांगितले.
धीरज हा प्रथम दर्जाच्या क्रिकेट कारकिर्दीतील शंभरावा सामना गोव्यात खेळत आहे. आसामचे कर्णधारपद भूषविणाऱ्या धीरज याला गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यात विजयाची आशा आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीविषयी तो म्हणाला की, ‘‘आसामकडून खेळण्याची संधी हा केवळ योगायोगच आहे. सहा वर्षांपूर्वी इंग्लंडमधील कौंटी सामने मी खेळत असताना एका सामन्यात मी नाबाद दीडशतक टोलविले होते. या सामन्यातील माझ्या कामगिरीचे तेथील वृत्तपत्रांमधून भरभरुन कौतुक करण्यात आले. हे वृत्त पाहून आसाम क्रिकेट संघटनेचे गौतम रॉय यांनी तेथे माझ्याशी संपर्क साधला. ते इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय सामने पाहण्यासाठी आले होते. रॉय यांनी आसामकडून सलामीत खेळण्याची विनंती मला केली. एखाद्या कमकुवत संघाकडून खेळणे ही माझ्यासाठी सोनेरी संधी होती. त्यामुळे मी तत्परतेने होकार दिला. तेव्हांपासून गेली सहा वर्षे माझे आसाम संघाशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते जोडले गेले आहे,’’
आसामकडून खेळताना तुझ्या काय भावना आहेत असे विचारले असता धीरज म्हणाला की, ‘‘फारशा सुविधा नाहीत, क्रिकेटबाबत उदासीनता, व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीत खेळणे हे माझ्यासाठी मोठे आव्हान होते. मात्र आपल्यावर मोठी जबाबदारी आहे हे ओळखूनच मी सुरुवातीपासून खेळलो व सातत्यपूर्ण कामगिरी करु शकलो. आसामकडून खेळताना मी ४७ सामन्यांमध्ये प्रथम दर्जाच्या चार दिवसांच्या सामन्यात १८ शतके, तर एक दिवसीय सामन्यांमध्ये तीन शतके ही खूपच समाधानकारक कामगिरी आहे. मी तेथे खेळावयास सुरुवात केल्यानंतर पहिल्याच वर्षी आमच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. दोन वर्षांपूर्वी आम्ही विजय हजारे चषक स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले. यंदाही आम्ही सातत्यपूर्ण कामगिरी करीत साखळी गटात दुसरे स्थान घेतले आहे,’’
कर्णधारपदाच्या जबाबदारीविषयी धीरज म्हणाला, गेली तीन वर्षे मी संघाचे नेतृत्व करीत आहे. मी सहकारी खेळाडूंना छोटय़ा छोटय़ा ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास नेहमी सांगत असतो. त्यामुळेच त्यांच्यात अतिशय आत्मविश्वास निर्माण झाला आहे. अजूनही आसाम संघातील बरेचसे खेळाडू नोकरीस प्राधान्य देत सवडीने सराव करतात. अर्थात तेथे क्रिकेटबाबत असलेली उदासीनता, राहणीमान आदी गोष्टीही खेळासाठी फारशा अनुकूल नाहीत. गेल्या तीन वर्षांमध्ये हळूहळू तेथे सकारात्मक बदल होत आहेत.
‘‘महाराष्ट्राला रामराम ठोकून आसामकडून खेळण्याचे दु:ख मला नेहमीच होत असते. कारण घरच्या वातावरणात, मैदानावर खेळ केला की चाहत्यांकडून खूपच प्रोत्साहन मिळत असते. अर्थात आसामकडून खेळण्याचा निर्णय मी स्वत:हून घेतला असल्यामुळे आता मागे वळणे शक्य नाही,’’ असेही धीरज म्हणाला.
मिलिंद ढमढेरे, पुणे