वृत्तसंस्था, बाकू (अझरबैजान) : भारताचा युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदने आपली स्वप्नवत घोडदौड कायम राखताना अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाला पराभवाचा धक्का देत सोमवारी विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता जेतेपदासाठी त्याला अव्वल जागतिक बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला नमवण्याची किमया साधावी लागेल.

पारंपरिक पद्धतीचे दोन डाव बरोबरीत सुटल्यानंतर ‘टायब्रेकर’मध्ये गेलेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत १८ वर्षीय प्रज्ञानंदने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या कारूआनाला ३.५-२.५ अशा फरकाने पराभूत केले. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा प्रज्ञानंद हा विश्वनाथन आनंदनंतरचा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू ठरला आहे. आनंदने सन २००० आणि २००२मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. मात्र, त्यावेळी ही स्पर्धा साखळी आणि बाद पद्धतीने खेळवली जात होती. तर २००५पासून विश्वचषक स्पर्धा केवळ बाद फेरी पद्धतीने खेळवली जात आहे. त्यामुळे प्रज्ञानंदच्या यशाला विशेष महत्त्व आहे.

यंदाच्या विश्वचषकात प्रज्ञानंदने यापूर्वी दुसरा मानांकित हिकारू नाकामुरा आणि भारतीय सहकारी अर्जुन एरिगेसी यांसारख्या खेळाडूंचा पराभव केला होता. त्याने कारूआनाविरुद्धही अप्रतिम खेळ केला. प्रज्ञानंद आणि कारूआना यांच्यातील पारंपरिक पद्धतीचे दोन आणि ‘टायब्रेकर’मधील दोन डाव बरोबरीत सुटले. मात्र, १० मिनिटांच्या पहिल्या जलद डावात पांढऱ्या मोहऱ्यांनी खेळताना प्रज्ञानंदने विजय नोंदवला. दुसऱ्या डावात कारूआनाला पांढऱ्या मोहऱ्यांनी विजय मिळवता आला नाही आणि प्रज्ञानंदचे अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पारंपरिक पद्धतीच्या डावात कारूआनाचे पारडे जड होते. मात्र, दोन्ही डावांत त्याने धोका पत्करणे टाळले आणि लढत ‘टायब्रेकर’मध्ये गेली. ‘टायब्रेकर’मध्ये चाली रचण्यासाठी बुद्धिबळपटूंकडे कमी वेळ असतो आणि या दडपणाखालीच खेळ उंचावणारा म्हणून प्रज्ञानंद ओळखला जातो. याचाच प्रत्यय कारूआनाविरुद्धच्या लढतीत आला. मात्र, प्रज्ञानंदने योजनाबद्ध खेळ करताना सामन्याचे पारडे आपल्याकडे झुकवले होते. – प्रवीण ठिपसे, ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू