भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस न करण्यात आल्याचा वाद अजून संपलेला नाही. या प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. भारताचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडून प्रणॉयच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी ३ जूनला शिफारस करण्यात होती.

‘‘अर्जुन पुरस्कारासाठी प्रणॉयच्या नावाची शिफारस मुख्य प्रशिक्षक म्हणून नाही तर खेलरत्न पुरस्कार विजेता या नात्याने गोपीचंद यांनी केली होती. मात्र त्या वेळेस प्रणॉयच्या बाबतीत शिस्तभंगाची प्रकरणे असल्याचे गोपीचंद यांना ठाऊक नव्हते,’’ असे बॅडमिंटनमधील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रणॉयचा सलग दुसऱ्या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) विचार करण्यात आलेला नाही. २ जूनला ‘बीएआय’कडून अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली होती. मात्र त्या यादीत नाव नसल्याने प्रणॉयने ‘बीएआय’विरुद्ध जाहीर आवाज उठवला. अखेर‘ बीएआय’ने प्रणॉयला ‘कारणे दाखवा’ नोटीस नुकतीच पाठवली आहे.

‘‘ज्या खेळाडूंनी आतापर्यंत राष्ट्रकुल, आशिया क्रीडा स्पर्धा यामध्ये पदके जिंकली नाहीत अशा खेळाडूंचा अर्जुन पुरस्कारासाठी विचार होतो मात्र मी पदके जिंकूनही माझा सलग दुसऱ्या वर्षी अर्जुन पुरस्कारासाठी विचार होत नाही,’’ अशी टीका प्रणॉयने ‘बीएआय’वर ‘ट्विट’ करत केली होती. स्पष्टीकरण मागवण्यात आल्यानंतर प्रणॉयने ते ‘ट्विट’ वगळले.