India vs England 2nd Test: आयपीएल २०२५ स्पर्धेत पर्पल कॅप पटकावणारा वेगवान गोलंदाज इंग्लंडमध्ये फ्लॉप ठरला आहे. प्रसिद्ध कृष्णाला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आलं आहे. मात्र, दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. प्रसिद्धने एकाच षटकात २३ धावा खर्च केल्या. यासह त्याच्या नावे कसोटी क्रिकेटमधील नकोसा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.
या डावात भारतीय गोलंदाजांना चांगली सुरूवात मिळाली होती. दुसऱ्या दिवशी आकाश दीपने इंग्लंडच्या २ फलंदाजांना शून्यावर माघारी धाडलं. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजने लागोपाठ २ चेंडूंवर बेन स्टोक्स आणि जो रूटला बाद करत माघारी धाडलं. त्यामुळे भारतीय संघाकडे इंग्लंडला लवकरात लवकर बाद करण्याची संधी होती. मात्र, स्मिथ आणि हॅरी ब्रुकने भारतीय गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला.
एकाच षटकात खर्च केल्या २३ धावा
प्रसिद्ध कृष्णा या डावात सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने ३२ व्या षटकात गोलंदाजी करताना २३ धावा खर्च केल्या. जेमी स्मिथने प्रसिद्ध कृष्णाच्या षटकात ०,४,६,४,४, वाईड, ४ अशा एकूण २३ धावा वसूल केल्या. यासह तो कसोटी क्रिकेटच्या इतिहासात चौथे सर्वात महागडे षटक टाकणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
या यादीत भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंग अव्वल स्थानी आहे. हरभजन सिंगने २००६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध झालेल्या लाहोर कसोटीत एकाच षटकात २७ धावा खर्च केल्या होत्या.
इंग्लंडच्या ३०० धावा पूर्ण
इंग्लंडला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले होते. संघातील प्रमुख फलंदाज जॅक क्रॉली , बेन स्टोक्स, जो रूट आणि बेन डकेट स्वस्तात माघारी परतले होते. मात्र जेमी स्मिथ आणि हॅरी ब्रुकने मिळून इंग्लंडचा डाव सांभाळला. स्मिथने १५० धावांचा पल्ला गाठला आहे. तर ब्रुकने शतक पूर्ण केलं आहे. इंग्लंडने ३०० धावा केल्या आहेत.