‘फिफा’ विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पात्रता फेरीत आपापल्या देशाकडून खेळण्यासाठी इंग्लिश प्रीमियर लीगमधील संघांनी खेळाडूंना मनाई केली आहे. त्यामुळे ‘फिफा’ आणि प्रीमियर लीगच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या या प्रकरणावरून वादविवाद सुरू आहेत.

पुढील वर्षी कतारमध्ये फुटबॉल विश्वचषक रंगणार असून त्यासाठीच्या पात्रता स्पर्धा आता अंतिम टप्प्यात येत आहेत. मात्र लिव्हरपूल, मँचेस्टर सिटी, चेल्सी यांसारख्या प्रमुख क्लब्सनी त्यांच्या महत्त्वाच्या खेळाडूंना यासाठी रजा देण्यात येणार नाही, अशी भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय संघांच्या चिंतेत भर पडली आहे.

लिव्हरपूलचा अ‍ॅलिसन, चेल्सीचा थियागो सिल्व्हा आणि मँचेस्टर सिटीचा गॅब्रिएल जिजस हे तिघे ब्राझीलचे खेळाडू असल्याने माजी विजेत्या ब्राझीलला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो. याशिवाय लिव्हरपूलचा मोहम्मद सलाहसुद्धा इजिप्तच्या पात्रता लढतींना मुकण्याची शक्यता बळावली आहे.

एम्बापेच्या समावेशासाठी रेयाल माद्रिदची दावेदारी

माद्रिद : पॅरिस सेंट-जर्मेनचा युवा आक्रमक किलियान एम्बापेचा क्लबसोबतचा करार पुढील वर्षी संपणार असून त्याला आपल्या संघात सामील करून घेण्यासाठी आतापासूनच बलाढ्य क्लब्समध्ये चढाओढ पाहायला मिळते आहे. बुधवारी रेयाल माद्रिद फ्रान्सच्या एम्बापेसाठी १६ कोटी युरो इतकी रक्कम मोजण्यास तयार असल्याची माहिती एका इंग्रजी संकेतस्थळाने दिली. यंदा ‘फ्री-ट्रान्सफर’च्या अंतर्गत सेंट-जर्मेनने रेयाल माद्रिदचा कर्णधार सर्जिओ रामोसला करारबद्ध केले. त्याबदल्यात रेयालने सेंट-जर्मेनच्या कोणत्याही खेळाडूला अद्याप करारबद्ध केलेले नाही. त्यामुळे पुढील वर्षी एम्बापेला रेयाल माद्रिदमध्ये येणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.