इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांचे मत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बर्मिगहॅम : उर्वरित कसोटी मालिकेत आमच्या गोलंदाजांनी भारताच्या अन्य फलंदाजांवर असाच अंकुश ठेवल्यास कर्णधार विराट कोहलीवरील दडपण वाढू शकेल, असा आशावाद इंग्लंडचे प्रशिक्षक ट्रेव्हर बेलिस यांनी व्यक्त केला.

‘‘विराट कोहली हा सर्वोत्तम फलंदाज आहे, असे मी म्हणणार नाही; परंतु त्याची फलंदाजी जवळपास जाणारी नक्की आहे. एजबॅस्टनच्या पहिल्या कसोटीमधील पहिल्या आणि दुसऱ्या डावातील त्याच फलंदाजी उच्च दर्जाची होती. जर आम्ही भारताच्या अन्य फलंदाजांवरील दबाव कायम ठेवल्यास स्वाभाविकपणे संघाचे दडपण विराटवर येईल,’’ असे बेलिस यांनी सांगितले.

दोन्ही डावांत भारतीय फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे पहिल्या कसोटीत भारताला ३१ धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. मात्र कोहलीने दोन्ही डावांत झुंजार खेळी साकारल्या. त्याने पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावले.

‘‘पहिल्या कसोटीमधील चारही डावांमध्ये फलंदाजांना खेळपट्टीवर टिकून फलंदाजी करणे अवघड गेले. कोहलीलासुद्धा फलंदाजी करणे आव्हानात्मक ठरले. बाहेरून सुंदर दिसणारी खेळपट्टी प्रत्यक्षात किती कठीण असू शकते, याचा प्रत्यय यानिमित्ताने आला,’’ असे बेलिस यांनी सांगितले.

पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही संघांच्या कामगिरीचे विश्लेषण करताना बेलिस म्हणाले, ‘‘एजबॅस्टन कसोटीमधील चुकांमधून भारतीय संघ धडा घेईल. तसेच इंग्लंडचा संघसुद्धा आत्मविश्वासने फिरकी गोलंदाजीचा सामना करण्यासाठी सज्ज असेल.’’

अष्टपैलू बेन स्टोक्स न्यायालयातील हजेरीसाठी दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही आणि डेव्हिड मलानला वगळण्यात आले आहे. त्यामुळे ख्रिस वोक्स आणि २० वर्षीय फलंदाज ऑलिव्हर पोप यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. याबाबत बेलिस म्हणाले, ‘‘वोक्स आणि पोप यापैकी कुणाला संधी मिळते, ते पाहणे महत्त्वाचे ठरते. वोक्स अतिशय तंदुरुस्त खेळाडू आहे. पोप रविचंद्रन अश्विनच्या फिरकीचा सामना करू शकतो, याबाबत आम्हाला खात्री आहे.’’

इंग्लंडच्या संघाने पहिल्या कसोटीत काही स्लिपमधील झेल सोडले. भारताकडूनही अशा चुका झाल्या. मलान आणि शिखर धवन यांनी महत्त्वाचे झेल सोडले. त्यामुळे कसोटीतील रंगत वाढली. याबाबत बेलिस यांनी सांगितले की, ‘‘पहिल्या कसोटीत आमच्या सर्वोत्तम क्षेत्ररक्षकांना स्लिपमध्ये ठेवले. मलानचे प्रयत्न अपयशी ठरले. किटॉन जेनिंग्स त्यापेक्षा अधिक यशस्वी ठरला.’’

इशांतकडून आणखी प्रभावी कामगिरी अपेक्षित -मॅकग्रा

नवी दिल्ली : इशांत शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत सात बळी घेऊन चांगली कामगिरी केली आहे. परंतु त्याच्याकडून यापेक्षाही अधिक कामगिरी होऊ शकते, हे लक्षात घेऊन त्याने गोलंदाजी केली पाहिजे, असे ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांनी सांगितले. ‘‘इशांतने कारकीर्दीला जेव्हा सुरुवात केली होती, त्या वेळी त्याच्या गोलंदाजीत असलेली भेदकता हल्ली दिसत नाही. अर्थात अनुभवाच्या जोरावर त्याने दिशा व टप्पा यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले आहे. परंतु संघाच्या विजयाचा शिल्पकार होण्यासाठी त्याने आणखी गांभीर्याने गोलंदाजी केली पाहिजे. भारतीय उपखंडातील खेळपट्टय़ा बहुतांश वेळा द्रुतगती गोलंदाजीस पोषक नसतात. त्यामुळेच इशांतला भरपूर यश मिळालेले नाही,’’ असे मॅकग्राने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pressure on other indian batsmen will put virat kohli under pressure trevor bayliss
First published on: 07-08-2018 at 04:58 IST