करोनाविरोधातील लढय़ासाठी जनजागृती मोहिमेत क्रीडापटूंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्र वारी केले. क्रिकेट कर्णधार विराट कोहली, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली, महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आदी नामांकित क्रीडापटूंशी पंतप्रधानांनी करोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानानंत जनजागृतीविषयी चर्चा केली.
पंतप्रधानांनी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्यासह देशातील ४०हून अधिक खेळाडूंशी सकाळी ११ वाजता जवळपास एक तास व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा केली. करोना रोखण्यासाठी सध्या देशात २१ दिवसांची टाळेबंदी लागू आहे.
देशात करोनाबाधितांची संख्या दोन हजारांहून अधिक झाली असताना पंतप्रधानांनी खेळाडूंना साथसोवळे आणि वैयक्तिक स्वच्छतेच्या जनजागृती उपक्र मात सहभागी होण्याचे आवाहन के ले.
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या बी. साईप्रणितने समाजमाध्यमांवर दाखल के लेल्या एका व्हिडीओमध्ये पंतप्रधान म्हणताना दिसत आहेत की, ‘‘तुमच्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ जसा प्रतिस्पध्र्याविरुद्ध मैदानावर त्वेषाने लढतो, तसाच आपण करोनाविरुद्ध लढा देऊ. तुमच्या प्रेरणेने भारत या आव्हानावर मात करील असा मला विश्वास आहे.’’
देशातील सर्वच क्रीडा स्पर्धा आता स्थगित करण्यात आल्या आहेत. त्या पुन्हा कधी सुरू होतील याची शाश्वती नाही. बहुप्रतीक्षित इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. पंतप्रधानांशी चर्चेत सामील झाल्याची कबुली ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष गांगुली यांनी दिली. परंतु तपशील सांगण्यास त्यांनी नकार दिला.
अग्रगण्य फलंदाज रोहित शर्मा, माजी वेगवान गोलंदाज झहीर खान, माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, दोन विश्वचषक जिंकू न देणारा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, सलामीवीर लोकेश राहुल या क्रिकेटपटूंनी या चर्चेत भाग घेतला. याशिवाय भालाफे कपटू नीरज चोप्रा, ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, धावपटू हिमा दास, बॉक्सिंगपटू अमित पंघाल, कुस्तीपटू विनेश फोगट आणि युवा नेमबाज मनू भाकर या खेळाडूंचाही व्हिडीओ कॉल चर्चेत समावेश होता. यापैकी १२ खेळाडूंना प्रत्येकी तीन मिनिटे मत मांडण्यासाठी देण्यात आली होती. यात तेंडुलकर, गांगुली, कोहली यांचा समावेश होता, अशी माहिती क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी दिली. सहा वेळा विश्वविजेत्या मेरी कोमला तांत्रिक कारणास्तव या चर्चेत भाग घेता आला नाही.
‘‘करोनाविरुद्धची लढत जिंकण्यासाठी आपल्याला विराटप्रमाणे झुंजार वृत्तीची आवश्यकता आहे,’’ असे पंतप्रधान म्हणाल्याचे टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमालने सांगितले.
आव्हानांना सामोरे जाणे, स्वयंशिस्त, सकारात्मकता आणि आत्मविश्वास ही क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाची वैशिष्टय़े असतात. करोनाविरुद्ध लढण्यासाठी त्यांची नितांत आवश्यकता आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले.
देशाने सांघिक लढा द्यावा -सचिन
संपूर्ण देशाला एकत्रितपणे करोनाविरुद्ध लढण्याचा हा काळ आहे. त्यामुळे एकमेकांना प्रेरणा देणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही खेळात संघभावनेने सामने जिंकता येतात, त्याचप्रमाणे देशाने एका संघाप्रमाणे लढा द्यावा, असे आवाहन माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने पंतप्रधानांशी झालेल्या चर्चेत के ले. या कठीण कालखंडात शारीरिक तंदुरुस्तीप्रमाणेच मानसिक तंदुरुस्ती राखणे महत्त्वाचे असते. मी घरी तंदुरुस्तीबाबत जे करतो, त्याची माहिती पंतप्रधानांना दिली, असे सचिनने सांगितले. ‘‘घरातील वडिलधाऱ्या माणसांची काळजी घ्या. ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि अनुभव हे आपल्या आयुष्यात महत्त्वाचे ठरले आहे,’’ असे सचिन म्हणाला.
