Prithvi Shaw Musheer Khan fight VIDEO MUM vs MAH Warm-Up Match : रणजी चषक २०२५-२६ सुरू होण्याआधी मुंबई व महाराष्ट्राच्या संघात पुण्यामध्ये आजपासून (मंगळवार, ७ ऑक्टोबर) सराव सामन्याला सुरुवात झाली आहे. या सराव सामन्याच्या पहिल्याच दिवशी मैदानात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. या सामन्यात महाराष्ट्राकडून खेळणारा पृथ्वी शॉ रागाच्या भरात त्याच्या जुन्या सहकाऱ्यावर धावून गेला. पृथ्वी शॉ बॅट घेऊन मुशीर खानच्या मागे धावत गेला. पृथ्वी शॉने स्वतःवरील नियंत्रण गमावल्याचं पाहायला मिळालं. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.

आठ वर्षे मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा पृथ्वी शॉ सध्या महाराष्ट्राच्या संघाकडून खेळत आहे. आज मुंबईविरोधात खेळवण्यात आलेल्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने २१९ चेंडूत १८१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. रणजी चषक २०२५-२६ च्या आधी खेळवण्यात आलेल्या या सराव सामन्यावेळी शॉने त्याची ताकद दाखवून दिली. त्याने मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यात फटके लगावले.

पृथ्वी शॉने १४० चेंडूत शतक झळकावलं. १८१ धावांवर खेळत असताना त्याने एक मोठा फटका लगावला. मात्र, सीमारेषेजवळ उभ्या मुशीर खान याने झेल टिपला आणि पृथ्वी शॉची वादळी खेळी संपुष्टात आणली. त्यानंतर पृथ्वी व मुशीरमध्ये मैनादातच राडा झाल्याचं पाहायला मिळालं.

मैदानावर नेमकं काय घडलं?

बाद झाल्यानंतर पृथ्वी शॉ पव्हेलियनच्या दिशेने चालू लागला होता. त्याचवेळी त्याच्यात व मुशीर खानमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पृथ्वी शॉ बॅट घेऊन मुशीर खानच्या दिशेने धावला. त्याने बॅट उगारली मात्र मुशीर व त्याच्यामध्ये बरंच अंतर होतं त्यामुळे बॅट मुशीरला लागली नाही. तेवढ्यात पंच देखील तिथे आले आणि त्यांनी स्थिती नियंत्रणात आणली. पंच पृथ्वी शॉला बाजूला घेऊन गेले, तर मुंबईचे खेळाडू मुशीर खानला दुसऱ्या बाजूला घेऊन गेले आणि मैदानावरील हा वाद मिटला.

मुशीर खान हा भारतीय संघातील खेळाडू सर्फराज खान याचा धाकटा भाऊ आहे. त्याने याआधी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

पृथ्वी शॉची पुनरागमनासाठी धडपड

पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली भारताने २०१८ चा १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक उंचावला होता. त्याच वर्षी त्याने भारतीय कसोटी संघात पदार्पण केलं. पदार्पणाच्या सामन्यात शतक ठोकून त्याने त्याची ताकद दाखवून दिली होती. मात्र, नंतरच्या काळात त्याला त्याचा फॉर्म टिकवता आला नाही. परिणामी त्याने भारतीय संघातील स्थान गमावलं. त्यानंतर त्याने आयपीएल संघातील स्थान गमावलं. रणजी क्रिकेटमध्ये देखील त्याची धडपड चालू आहे. अलीकडेच त्याने बूची बाबू स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. तसेच रणजी स्पर्धेआधी खेळवण्यात आलेल्या सराव सामन्यांमध्ये त्याची बॅट चांगलीच तळपल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे यंदाच्या रणजी स्पर्धेत त्याच्या कामगिरीकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष असेल.