भारतीय क्रिकेटचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी हल्लीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. भारतीय संघातील दोन मोठ्या खेळाडूंनी कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरू आहे. त्यांच्यानंतर भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद युवा शुबमन गिलला देत भारतीय क्रिकेटच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे. दरम्यान भारताच्या अजून एक खेळाडूने निवृत्ती जाहीर केली आहे.
आता भारताच्या आणखी एका स्टार खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा म्हटलं आहे. या खेळाडूने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना ही माहिती दिली. या खेळाडूची प्रथम श्रेणी कारकीर्द खूप संस्मरणीय होती आणि त्याची भारतीय संघात निवडदेखील झाली होती. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
अनुभवी देशांतर्गत क्रिकेटपटू प्रियांक पांचाळ यांने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. प्रियांक पांचाळ हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये गुजरातचा एक मजबूत आधारस्तंभ होता. त्याने गुजरात संघाचे नेतृत्त्वही केले आहे. त्याने अनेक संस्मरणीय खेळी खेळल्या आणि अनेक वेळा संघाला विजय मिळवून दिला. त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी, संयम आणि सातत्य यामुळे तो भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक विश्वासार्ह नाव बनला.
प्रियांकने इंडिया-अ संघासाठी अनेकदा प्रभावी कामगिरी केली, ज्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले. पण तो कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करू शकला नाही. २०२१ मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी त्याची टीम इंडियामध्ये निवड झाली होती. रोहित शर्माला दुखापत झाल्यानंतर त्याला संघात समाविष्ट करण्यात आले. पण त्याला पदार्पणाची संधी मिळाली नाही.
प्रियांक पांचाळने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, ‘मोठे झाल्यावर प्रत्येकजण आपल्या वडिलांना आपला आदर्श मानतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेतो आणि त्यांच्यावर आपल्या प्रगतीने प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करतो. मीही काही वेगळा नव्हतो. माझे वडील माझ्यासाठी दीर्घकाळ टिकणारे बळ होते. माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी एका लहान शहरातून पुढे येत एक दिवस भारतीय संघासाठी क्रिकेट खेळण्याची त्यांनी मला प्रोत्साहन दिले ते पाहून मी प्रभावित झालो.
प्रियांकने पुढे लिहिलं, ते खूप वर्षांपूर्वी आम्हाला सोडून गेले आणि त्यांचं स्वप्न जवळजवळ दोन दशकं, ऋतूमागून ऋतू, आजपर्यंत माझ्याबरोबर आणलं आहे. मी, प्रियांक पांचाळ, प्रथम श्रेणी क्रिकेटमधून तात्काळ निवृत्ती जाहीर करतो.
प्रियांक पांचाळने त्याच्या कारकिर्दीत एकूण १२७ प्रथम श्रेणी सामने खेळले. यादरम्यान त्याने ४५.१८ च्या सरासरीने ८८५६ धावा केल्या, ज्यात ३४ अर्धशतकं आणि २९ शतकांचा समावेश आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १६ विकेट्सही घेतल्या. याचबरोबर, प्रियांक पांचाळ २०२३ नंतर कोणताही लिस्ट ए आणि टी२० सामना खेळलेला नाही. लिस्ट ए मध्ये त्याने ९७ सामन्यांमध्ये ३६७२ धावा आणि टी-२० मध्ये १५२२ धावा केल्या आहेत. म्हणजेच त्याने त्याच्या देशांतर्गत कारकिर्दीत १४००० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.