करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली. सध्याच्या घडीला देशातली परिस्थिती पाहता हे लॉकडाऊन वाढवलं जाण्याची शक्यताही आहे. जिवनावश्यक गोष्टींचा अपवाद वगळता सर्व गोष्टी या काळात बंद राहणार आहेत. मात्र या लॉकडाऊनचा देशातील अनेक रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांना, गोर-गरिबांना फटका बसला आहे. अशा खडतर काळात अनेक क्रीडापटू गरजूंच्या मदतीसाठी समोर येत आहेत.
मराठमोळा कबड्डीपटू श्रीकांत जाधवने या काळात आपल्या गावातील गरजू व्यक्तींना मोफत धान्यवाटप केलं आहे. श्रीकांत अहमदनगर जिल्ह्यातील शेगावचा रहिवासी आहे. राष्ट्रीय स्पर्धांमध्ये श्रीकांत रेल्वेच्या संघाचं प्रतिनिधीत्व करतो. तर प्रो-कबड्डीत श्रीकांत यूपी योद्धा संघाकडून खेळतो.
