scorecardresearch

प्रो कबड्डी लीग : प्रदीपला वेसण घालत पाटणा पायरेट्स चौथ्यांदा अंतिम फेरीत

चतुरस्र चढायांची क्षमता असलेला प्रदीप नरवाल पूर्वाश्रमीच्या पाटणा पायरेट्स संघाविरुद्ध निष्प्रभ ठरला.

उपांत्य लढतीत यूपी योद्धा संघाचा तारांकित चढाईपटू प्रदीप नरवालची पकड करताना पाटणा पायरेट्सचे क्षेत्ररक्षक.

मोहम्मदरझाच्या दिमाखदार पकडी; दिल्लीची बंगळूरुवर मात

वृत्तसंस्था, बंगळूरु : चतुरस्र चढायांची क्षमता असलेला प्रदीप नरवाल पूर्वाश्रमीच्या पाटणा पायरेट्स संघाविरुद्ध निष्प्रभ ठरला. त्यामुळे यूपी योद्धा संघाला २७-३८ अशी हार पत्करावी लागली. मोहम्मदरझा श्ॉडलोईच्या दिमाखदार पकडींमुळे पाटण्याने चौथ्यांदा प्रो कबड्डी लीगची अंतिम फेरी गाठली. शुक्रवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात पाटणा पायरेट्सची गतउपविजेत्या दबंग दिल्लीशी गाठ पडणार आहे.

पहिल्या उपांत्य सामन्यात पाटण्याने दोन मिनिटे आधी दुसरा लोण यूपीवर चढवला आणि पहिल्या सत्रात २३-९ अशी निर्विवाद आघाडी मिळवली. यूपीने दुसऱ्या सत्रात रणनीती बदलून सामना वाचवण्याचा कसोटीने प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले. यूपी संघातील प्रदीपच्या १६ चढायांमध्ये ६ पकडी झाल्या, तर ५ चढाया निष्फळ ठरल्या. त्यामुळे फक्त ५ गुण त्याला कमावता आले. त्या तुलनेत बदली खेळाडू श्रीकांतने जाधवने दिमाखदार कामगिरी करताना १० गुण मिळवले. पाटण्याकडून मोहम्मदरझा आणि सुनील यांनी पकडींचे अनुक्रमे सहा आणि पाच गुण मिळवले. याचप्रमाणे सचिनने चढायांचे ७ आणि गुमान सिंगने चढायांचे ८ गुण मिळवले.

दुसऱ्या उपांत्य सामन्यात नवीन कुमार (१४ गुण) आणि पवन शेरावत (१८ गुण) यांच्यातील चढाओढींत पवनने सरशी साधली. परंतु सामना मात्र नवीनच्या दिल्लीने ४०-३५ अशा फरकाने जिंकला. सुरुवातीपासून नवीन-पवनच्या चढायांनी रंगत आणलेल्या या सामन्यात बंगळूरुने पहिल्या सत्राअखेरीस १७-१६ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात दिल्लीने पवनवर नियंत्रण ठेवत सामना जिंकला. दिल्लीकडून नीरज नरवाल आणि विजय यांनी चढायांचे अनुक्रमे ५ आणि ४ गुण मिळवले. बंगळूरुकडून भरतने चढायांचे ४ गुण मिळवले. तर सौरभ नंदाल आणि महेंदर सिंग यांनी दिमाखदार पकडी केल्या.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pro kabaddi league patna pirates reach final fourth time beating pradeep ysh

ताज्या बातम्या