मुंबईत काल दिवसभर पडत असलेल्या पावसाने आता काही वेळासाठी का होईना विश्रांती घेतलेली आहे. मात्र काल दिवसभर पावसाने मुंबईला झोडपून काढलं. या पावसामुळे एरवी घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबई ठप्प झाली होती. सर्वसामान्य मुंबईकरांप्रमाणे प्रो-कबड्डीच्या खेळाडूंनाही या पावसाचा काल चांगलाच फटका बसला. सुरुवातीला मुंबईत पावसाचा रागरंग पाहुनही आयोजकांनी सामने खेळवण्याचा निर्णय घेतला. मात्र चारही संघ सामन्याच्या वेळी न पोहचू शकल्यामुळे अखेर कालच्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.

बंगळुरु बुल्स संघाच्या संघालाही या सततच्या पावसाचा सामना करावा लागला. ८ वाजताच्या सामन्यासाठी ४ वाजता आपल्या हॉटेलवरुन निघालेल्या बंगळुरुचा संघ वेळेत मैदानात पोहचू शकला नाही. मुंबईच्या पावसाने काल बंगळुरुच्या संघाचे मैदानात पोहचण्याची मनसुबे पूर्ण होऊ दिले नाहीत.

अखेर पावसाचा जोर पाहता आयोजकांनी सामने रद्द करण्याचे निर्णय घेतला आणि बंगळुरुच्या संघाने पुन्हा हॉटेलवर परतण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा परतीचा रस्ताही सोपा नव्हता. परतीच्या रस्त्यावर बंगळुरुच्या संघाला पुन्हा वाहतुककोंडीचा सामना करावा लागला. यावर रस्ता काढण्यासाठी काही खेळाडूंनी बसच्या टपावर जाऊन चालकाला रस्ता दाखवण्याचा प्रयत्न केला. अखेर प्रशिक्षक रणधिर सिंह आणि खेळाडूंनी रस्त्यावर उतरत पायी हॉटेल गाठणं पसंत केलं.

तब्बल अडीच तास पायपीट केल्यानंतर बंगळुरु बुल्सचा संघ आपल्या हॉटेलवर पोहचला. या पर्वात बंगळुरुच्या संघाचा पुढचा सामना आता कोलकाता शहरात होणार आहे. त्यामुळे मुंबई शहरात केलेली पायपीट बंगळुरुला पुढच्या सामन्यांमध्ये कामी येते का हे पहावं लागणार आहे.