अखेरच्या क्षणात संयम दाखवत केलेल्या खेळाच्या जोरावर प्रो-कबड्डीत हरियाणा स्टिलर्सने तेलगू टायटन्सवर मात केली. ३२-३० असा निसटता विजय मिळवत हरियाणाने गुणतालिकेतलं आपलं दुसरं स्थान कायम राखलं आहे. हरियाणाच्या संघासाठी वझीर सिंह आजच्या सामन्याता हिरो ठरला. आपल्या संघाच्या चढाईची धुरा आपल्या खांद्यावर घेत वझीरने अखेरच्या चढाईत आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
हरियाणाच्या विजयात आज बचावपटूंना आपलं योगदान देण्याची गरजच भासली नाही. संघातल्या चढाईपटूंनी विजयात आपली छाप पाडली. यात वझीर सिंहने सर्वाधीक १४ गुणांची कमाई केली. त्याला दिपक कुमार दहियाने ५, सुरजित सिंहने ४ तर प्रशांत कुमार रायने २ गुणांची कमाई करत चांगली साथ दिली. बचावफळीत सुरिंदर नाडाचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला गुण मिळवता आला नाही.
तेलगू टायटन्सने आजच्या सामन्यात हरियाणाला मोठी आघाडी घेण्याची संधी दिली नाही. कर्णधार राहुल चौधरीचे चढाईतले ११ गुण आणि त्याला मराठमोळ्या निलेश साळुंखेने १० गुणांची कमाई करत दिलेली साथ हे तेलगू टायटन्सच्या डावातल्या महत्वाच्या बाबी ठरल्या. मात्र या दोघांचा अपवाद वगळता एकाही खेळाडूला आपली छाप पाडता आली नाही. त्यात सामन्यामध्ये तेलगूने आपल्या राखीव खेळाडूंपैकी एकाही खेळाडूला सामन्यात खेळण्याची संधी दिली, ज्याचा संघातील खेळाडूंवर काहीसा दबाव आलेला पहायला मिळाला.
बचावफळीत रोहित राणा आणि विशाल भारद्वाज या खेळाडूंनी आपल्या संघासाठी प्रत्येकी २-२ गुणांची कमाई केली. मात्र शेवटच्या चढाईत सामना बरोबरीत सोडवण्याची संधी आलेली असताना, तेलगूच्या बचापटूंनी वझीर सिंहला मध्य रेषेवर पकडण्याची मोठी चूक केली. ज्याचा फायदा घेत वझीर सिंहने आपल्या संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.