प्रो-कबड्डीच्या इतिहासात अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेल्या तामिळ थलायवाजचं सातव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. शनिवारी जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानावर झालेल्या सामन्यात यूपी योद्धा संघाने तामिळ थलायवाजवर ४२-२२ ने मात केली. या हंगामातला तामिळ थलायवाजचा हा १२ वा पराभव ठरला. आतापर्यंत खेळलेल्या १८ सामन्यांमध्ये तामिळ थलायवाजचा संघ फक्त ३ सामने जिंकू शकला आहे, ज्यामुळे तामिळ थलायवाजच्या खात्यात ३० गुण जमा झाले आहेत. उरलेले सामने लक्षात घेता आता तामिळ थलायवाजचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहचण्याची शक्यता मावळली आहे.

अवश्य वाचा – Pro Kabaddi 7 : विक्रमवीर प्रदीप नरवालचं द्विशतक, रचला अनोखा इतिहास

सातव्या हंगामासाठी तामिळ थलायवाजने आपल्या संघात अनेक बदल केले होते. कर्णधार अजय ठाकूरच्या सोबतीला यंदाच्या हंगामात अनेक अनुभवी खेळाडू सोबतीला होते. सहा हंगाम तेलगू टायटन्सकडून खेळणारा राहुल चौधरी, मनजीत सिंह, मोहीत छिल्लर, रण सिंह, शब्बीर बापू हे सर्व खेळाडू तामिळ थलायवाजच्या ताफ्यात होते. मात्र तरीही या खेळाडूंना आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. यंदाच्या हंगामात स्पर्धेबाहेर पडणारा तामिळ थलायवाज पहिला संघ ठरला आहे.

तामिळ थलायवाजच्या वाट्यात आता फक्त २ साखळी सामने शिल्लक राहिले आहेत. या दोनही सामन्यांमध्ये तामिळ थलायवाजचा संघ जिंकला तरीही प्ले-ऑफसाठीचे निकष पूर्ण होत नाहीयेत. गुणतालिकेत पहिल्या सहा स्थानावर असलेले संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत दाखल होणार आहेत. यू मुम्बाचा अपवाद वगळला तर ६ पैकी पाचही संघांनी ५० गुणांचा टप्पा ओलांडला आहे. यू मुम्बाचा संघ ४८ गुणांसह सध्या सहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे उरलेल्या सामन्यांमधील प्रतिस्पर्ध्यांचा विचार केला तर तामिळ थलायवाजचा संघ प्ले-ऑफमध्ये दाखल होण्याची शक्यता कमीच आहे.