संदीप कदम, लोकसत्ता

मुंबई : महिलांच्या ‘युएफा’ चॅम्पियन्स लीगमध्ये खेळण्याची संधी मिळणे, ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. या स्पर्धेत खेळणारी मी पहिली भारतीय खेळाडू ठरल्याने माझा आनंद द्विगुणित झाला आहे, अशी भावना युवा आघाडीपटू मनीषा कल्याणने व्यक्त केली. मनीषाने सायप्रसच्या इंगोमी येथे युरोपियन क्लब फुटबॉल स्पर्धेत अपोलोन लेडीज एफसीकडून सहभाग नोंदवला.

‘‘चॅम्पियन्स लीग पात्रतेच्या सामन्यात खेळणे, हा एक रोमांचक क्षण होता. मी प्रशिक्षकांच्या सर्व सूचनांचे पालन करण्याचा प्रयत्न करत होते. या पुढेही संधी मिळाली, तर मी पुन्हा सर्वोत्तम कामगिरी करेन याची खात्री आहे,’’ असा निर्धार मनीषाने व्यक्त केला.

अपोलोन लेडीज क्लबकडून खेळण्याबाबत मनीषा म्हणाली, ‘‘या वर्षी भारतीय महिला लीग (आयडब्ल्यूएल) हंगाम पूर्ण झाल्यानंतर मी परदेशात खेळण्यासाठी वेगवेगळय़ा संधी शोधत होते. अनेक संघांनी मला त्यांच्याकडून खेळण्याबाबत विचारणा केली. परंतु अपोलोन संघाने मला सर्वाधिक प्रभावित केले. अपोलोनकडे चांगल्या सुविधेसह त्यांची संघबांधणीही मजबूत होती. त्यामुळे ही संधी मी स्वीकारली.’’ मनीषाला २०२१-२२ वर्षांसाठी ‘एआयएफएफ’ सर्वोत्तम महिला फुटबॉलपटूच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

देशातील आणि परदेशामधील लीगमध्ये काय फरक जाणवतो, याविषयी मनीषा म्हणाली, ‘‘सायप्रसमध्ये येऊन मला फक्त दीड महिना झाला आहे. येथील स्थानिक लीग पुढील महिन्यात सुरू होईल. मात्र आम्ही ‘युएफा’ महिला चॅम्पियन लीग पात्रता स्पर्धेच्या तयारीसाठी आधीच काही मैत्रीपूर्ण सामने खेळले आहेत. येथील फुटबॉलचा स्तर उत्तम आहे. भारतातील महिला लीगचीही झपाटय़ाने प्रगती होत आहे. मी गेल्या काही वर्षांपासून भारतीय महिला लीगमध्ये खेळत आहे. ही लीग देशातील सर्वोच्च दर्जाची लीग म्हणून येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल, असे मला वाटते.’’

जागतिक दर्जाच्या संघांविरुद्ध खेळणे फायदेशीर!

‘‘गेल्या काही वर्षांत भारतीय महिला फुटबॉल संघाने चांगली कामगिरी केली आहे. राष्ट्रीय संघासोबत आम्ही विविध शिबिरांसह सहभाग नोंदवताना अनेक सामने खेळले आहेत. ब्राझील, चिली आणि व्हेनेझुएला यांसारख्या जागतिक दर्जाच्या संघांविरुद्ध खेळण्याचा अनुभव आमच्यासाठी फायदेशीर ठरला आहे. तसेच स्वीडनमधील विविध क्लबशीही आम्हाला सामने खेळण्यास मिळाले. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात महिला फुटबॉलची वाढ होत असून आगामी काळात दर्जा आणखी उंचावेल,’’ असा विश्वास मनीषाने व्यक्त केला.